Pages

Thursday, November 8, 2012

जस्ट लाईक दॅट १६


आत्तापर्यंत:

जीत आणि राजकडे आदित्य पोहोचला तेव्हा जीत तयार होऊन बसला होता. त्याने नेहमीच्या जीन्सवर साधा झब्बा घातला होता. 
"हे काय? तू असा येणारेस?" आदित्यने विचारलं.
"मग अजून कसं यायचं?" जीतचा प्रश्न.
"अरे, ही जी काही दिवाळी नाईट इव्हेंट आहे ती पुन्हा पुन्हा थोडीच होणारे...वर्षातला एक दिवस आहे...नटून घे थोडा..." आदित्य कुर्ता 'सावरत' सोफ्यावर बसला. 
"ते काही मला नाही जमत..कुर्ता भारी आहे तुझा...आणि हां, आमच्या अपार्टमेंटमध्ये नटायची जबाबदारी राजची आहे जे की तो इमानेइतबारे पार पाडतोय...त्याने त्याच्या ग्रुपच्या एका जपानी मुलीला पण इन्व्हाईट केलंय...कियोमी काटो..."
"भारी आहे..म्हणजे हा जेवायला त्या कियोमीबरोबर का?"
"काय माहित...मला तर वाटतं ती टांग देणारे..." जीतने टाळीसाठी हात पुढे केला. आदित्यने टाळी दिली.
"हरामखोर आहात तुम्ही दोघं..." राज त्याच्या शेरवानीची 'ओढणी' सावरत बाहेर आला.  
"अरे, बापरे...आज काही खरं नाही...कियोमी नाही आली तरी दोन-चार गोऱ्या तर नक्की असणारेत राजच्या आजूबाजूला..." आदित्य राजच्या कपड्यांकडे बघत थट्टेच्या सुरात म्हणाला.
"काय करणार? नटावं लागतं साहेब...तुमच्यासारखं नाही होत..अमेरिकेला आलात आणि चार दिवसात मुलीबरोबर राहायला लागलात...आम्ही दोन-दोन वर्षं राहून आमची मैत्री सोडा पण धड कुठल्या पोरीशी चांगली ओळखसुद्धा नाही..." आदित्य गप्प झाला. 
"चला, बाहेर पडायचं का?" जीतने  विचारलं.
"अरे मेघा येतेय ना..तिने मला कॉल केलेला..फक्त दर्शना, मनीषा आणि रमा गेल्यात पुढे.."
"म्हणजे बराच वेळ आहे...चहा पिऊन निघू.." जीत हसत किचनकडे वळला.
"रमा, घरूनच रेडी होऊन गेली का रे?" राजने चौकशी केली. 
"माहित नाही रे...मी अंघोळीला गेलो होतो.." राज अजून काही विचारणार तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला."जीत, चहा नको करत बसू रे...ही आली बघ..." तो फोन उचलत म्हणाला.

आदित्यने रमाला स्टेजवर पाहिलं तेव्हा तो क्षणभर स्तब्ध झाला. तिने मोरपंखी रंगाची साडी नेसली होती. आत्तापर्यंत त्याने तिला जीन्स-टॉप अशा कपड्यांमध्येच पाहिलं होतं. त्याच्यासमोर स्टेजवर असणाऱ्या मुलीला तो पहिल्यांदाच पाहत होता आणि ती खूप छान दिसत होती. पुन्हा एकदा एकमेकांबद्दल 'नवीन' वाटणारं काहीतरी होतं. रमाबद्दल या क्षणाला असणारं फिलिंग त्याला स्वतःकडेसुद्धा मांडता येत नव्हतं. स्वतःला घालून घेतलेल्या 'नैतिक बंधनं' या प्रकाराचा त्याला मनस्वी राग आला. दर्शना मध्ये होती आणि रमा आणि मनीषा एकेका बाजूला. पण त्याचं बाकी दोघींकडे अजिबात लक्ष गेलं नाही. मेघा टाळ्या वाजवण्यात बिझी होती. राज पुढे होऊन फोटो घ्यायला गेला होता. जीतच्या नजरेतून मात्र आदित्यचं रमाकडे पाहणं सुटलं नव्हतं.पण त्याच्या स्वभावाप्रमाणे तो लगेच काही बोलला नाही. डान्स झाल्यावर तिघी खाली आल्या तेव्हा रमाने सगळ्यात आधी आदित्यकडे पाहिलं आणि 'कसा झाला डान्स?' हे विचारायच्या अर्थाने भुवया उंचावल्या. त्याने हसून मान डोलावली. गोंगाटातला एकांत शोधून दोघे पुन्हा ग्रुपचा भाग होऊन गेले. 
"आपली ती सेकंड टाईम स्टेप मिस झाली.." दर्शु म्हणाली. रमा आणि मनीषाने मान डोलावली. 
"आम्हांला तरी असं काही वाटलं नाही...हो की नाही रे राज?" मेघा 
"हो..मी फोटो काढले त्यात तुम्ही तिघी सेम पोसमध्येच आहात...भारी आलेत फोटो" राज 
"हं..तरी आम्हाला सेम कलरच्या साड्या मिळाल्या नाहीत..मला वाटलेलं की प्रियाकडे ग्रीन साडी आहे पण ती इंडियाला घेऊन गेली आणि तिने परत आणली नाही असं तिने सांगितलं" मनीषा 
"तरी..ओव्हरोल रंग सेम वाटत होते...काय आदित्य..बरोबर ना?" जीतने आदित्यकडे अर्थपूर्ण नजरेने पाहत विचारलं.
"अ..काय?"आदित्यचं अजिबात लक्ष नव्हतं. 
"अरे साडीचे रंग..."
"त्यांचं काय? चांगले होते की.." आदित्य शब्द जुळवत म्हणाला. जीत हसला. त्याने आपल्याला 'धरलंय' हे आदित्यला लक्षात आलं. तो उत्तरादाखल हसला. मुली त्यांच्या गप्पांमध्ये बिझी झाल्या होत्या. राज कॅमेरामधले फोटो न्याहाळत होता.
"ए..ऐका...आता जेवायचं ना?" मनीषाने विचारलं.
"मला तरी अजून काही बेटर सुचत नाहीये..पण तुम्ही मुली काय ते जाऊन आवरून येणार असाल ना?" जीत 
"करेक्ट...आलोच आम्ही पाच मिनिटात...तुम्ही तिघे पुढे होताय तर व्हा..." दर्शना.
"मी आणि आदित्य थांबतो...राज बहुतेक जपानी पंगतीला आहे.." जीत राजकडे बघत म्हणाला.
"कप्पाळ जपानी पंगत...अरे ती कियोमी तिच्या दोन-चार लोकांबरोबर आलीय...ती एकटी असली असती तर गोष्ट वेगळी होती...पण ५ जपानी लोकांमध्ये त्यांच्या भाषेत काहीतरी ऐकून घेत,समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी इथेच बरा आहे" 
"कियोमी? ती तुझ्या ग्रुपमधली? आल्यावर बोललंच पाहिजे या विषयावर" दर्शना हसत इतर तिघींच्या मागे गेली. 
"येऊ दे यांना.आपण थांबूया. तरी नशीब की प्रिया नाहीये इथे नाहीतर आपल्याला ऑकवर्डपणे हिंदीत बोलायला लागलं असतं" 

सगळे जण खायला घेऊन येऊन बसले. 
"आदित्य, तू चिकन का खात नाहीयेस?" राज 
"त्याला दिवाळीच्या नावाखाली चिकन खाल्लेलं पसंत नाही" मेघाने उत्तर दिलं.
"एवढा,विचार नाही करायचा रे...जर का आपण अमेरिकन पद्धतीने सण साजरा करतोय तर ते खातात तसं नॉन-व्हेज खायला काय हरकते?" राजचा प्रश्न.
"मी काही म्हणत नाहीये...मी त्यांच्या सणाला नॉन-व्हेज खायला तयार आहे...मी तर म्हणतोय की थॅंक्सगिविंगला टर्की बनवूया.." आदित्यने पहिल्यांदाच एखाद्या प्रश्नाला रोखठोक उत्तर दिलं होतं. रमा मनातल्या मनात खुश झाली.
"ते जाऊ द्या सगळं...राज ही कियोमीची काय भानगड आहे?" दर्शनाने विचारलं.
"भानगड वगैरे काही नाहीये...मी तिला आज इंडियन फेस्टिवल सेलिब्रेशन फंक्शन आहे असं सांगून बोलावलं होतं. ती म्हणे की तिचं तिकीट तिच्या मित्राने आधीच काढलं होतं. तो गेली दोन वर्षं येतोय...त्याला इंडियन जेवण आवडतं..आणि आदित्य, बिलीव्ह मी..हे जेवढे गोरे तू बघतोयस ना त्यातले अर्धेअधिक लोक इंडियन चिकन करी खायला आलेत.." आदित्यने उत्तर न देता मान डोलावली. 
"पुन्हा विषय बदलू नको राज....आपण कियोमीबद्दल बोलत होतो..तू तिला का बरं इन्व्हाईट केलंस?" मेघा 
"तुम्ही मागेच लागलात..."
"कियोमी नाहीये बरोबर तर काय झालं? मी आज त्याचा फोटो काढून त्याच्या घरी पाठवणारे...सध्या स्थळं बघणं सुरू झालं आहे..सो करेक्ट गेट-अप आहे त्याचा फोटोसाठी" जीत भाताचा चमचा तोंडात टाकत म्हणाला.
"आणि तोच फोटो आपण फेसबुकवर टाकू..उतावळा नवरा म्हणून" मनीषा.
"मी काही उतावळा नवरा वगैरे नाहीये...घरचे दोनेक वर्षं मागे लागलेत..त्यांना थांबवायला दुर्दैवाने मला कुणी गल्फ्रेंड नाहीये..आमच्याकडे साताऱ्यात लोकांची एव्हाना लग्न झालेली असतात..म्हणून घरचे स्थळं बघतायत..काय चुकलं?" राज थोडा चिडल्यासारखा वाटला. मनीषा गप्प झाली. पण तो सगळ्यांना उद्देशून बोलला असल्याने कुणीतरी डिफेंड करणं गरजेचं होतं.
"राज,तुला नेमका राग कसला आहे? तुला गल्फ्रेंड नाही याचा की आम्ही तुला तुझं लग्न ठरणारे याच्यावरून चिडवतो आहे याचा? की तुझं अजून काही बिनसलंय?" दर्शनाने विचारलं. राज गप्प झाला. थोड्या वेळाने स्वतःच म्हणाला.
"तुम्हांला सगळ्यांना गंमत वाटत असेल...मला गल्फ्रेंड नाहीये याचा राग मी तुमच्यावर कशाला काढेन? तो स्वतःवरच काढायला हवा ना? पुढच्या वर्षी या वेळी कदाचित माझं एखाद्या अनोळखी मुलीशी लग्न झालेलं असेल..मला नकोय तसं..आय मीन...आधीच पी.एच.डी नंतर मी काय करणार हे नक्की ठरत नाहीये माझं...त्यात मला एखाद्या अनोळखी मुलीची लाईफ पार्टनर म्हणून जबाबदारी घेणंसुद्धा कसंतरी वाटतं.."
"मग नको करूस लग्न.." रमा म्हणाली. सगळ्यांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.
"तसं नाहीये...लग्न कधीतरी करायचं आहेच ना...आणि गेल्या ७-८ वर्षात मला कुणी भेटलं नाही तर आता कोण भेटणारे?" राज खिन्नपणे म्हणाला.
"म्हणजे तू लग्न एक रुटीन म्हणून करायचं म्हणतो आहेस?" आदित्यच्या प्रश्नावर राजने खांदे उडवले.
"मी अजून गुलाबजाम आणतोय...कुणाला काही हवंय?" राज त्याची प्लेट घेऊन उठला. त्याला या डिस्कशनमधून बाहेर पडायचं होतं.
"तो काही एकटा नाहीये जगात असा. कित्येक लोक आहेत की जे अनोळखी लोकांशी लग्न करतात..त्यात काय एवढं?" मेघा 
"मला असं वाटतं की आपण जगाच्या इतिहासातल्या सगळ्यात कॉम्पलिकेटेड जनरेशनचे लोक आहोत. आपल्यातल्या अर्ध्याअधिक लोकांना कॉलेजमध्ये गेलो न गेलो तेच कुणीतरी आवडतं. प्रेम कशाशी खातात याची अक्कल पण नसते पण आपण प्रेमात 'पडतो'. ब्रेक-अप होणं,नवीन अफेअर या गोष्टी खूप सहज होतात. काही राजसारखे असतात. एखाद्या अनोळखी मुलीबरोबर आयुष्य काढणं जमणार नाही हे त्याला वैचारिक दृष्ट्या पटतं पण लग्न या गोष्टीकडे मात्र तो निव्वळ रुटीन म्हणून बघतो" आदित्यने सुस्कारा सोडला.  
"आपण उगाच कियोमीवरून पिडलं त्याला" मनीषा खट्टू होत म्हणाली.
"काही उगाच नाही...त्याला कधीच कुणी मुलगी भेटली नाही यामुळे त्याला थोडा कॉम्प्लेक्स आहे...आता घरचे लग्नासाठी मागे लागले आहेत, घरच्यांचं काही चूक नाही. पंचविशी उलटून गेली तरी मुलगा अजून शिकतोय. घरच्यांना काळजी की आमचं पोर सेटल कधी होणार?" जीतची निर्विकार कमेंट. 
"तुम्ही मुलं असं म्हणताय मग आम्ही मुलींनी काय म्हणायचं? आमच्या घरून आमच्यावर लग्नासाठी प्रेशर येत नसेल?" मेघा.
"माझ्या जॉब करणाऱ्या, लग्न झालेल्या, मुलं झालेल्या मैत्रिणी मला सारख्या विचारतात की तू लग्न कधी करते आहेस? मला हेवा वाटतो त्यांचा..आयुष्यात काय करायचं हे त्यांना खूप लौकर कळून गेलं आणि आपण स्वतःला हुशार म्हणवून घेत मागे राहिलो असं वाटायला लागतं.." दर्शनाची तक्रार.
"तसं काही नाहीये बरं का दर्शु..सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपण शिक्षण अशा लेव्हलचं घेतोय की इतका वेळ जाणं सहाजिक आहे" मनीषा 
"हो आणि आपण किंवा जगात कुणीच पीएचडी च्या पुढे शिकू शकत नाही" मेघा अभिमानाने म्हणाली.
"सगळं ठीके पाटकर बाई..पण कधी कधी असं वाटतं की ही इतकी सगळी मेहनत कशासाठी? शेवटी पाट्याच टाकणार आपणसुद्धा" राज परत आला होता.
"हो..पण ते काम आपण जगातल्या हजारो,लाखो लोकांपेक्षा चांगलं करू आणि माझ्या मते ते जास्त महत्वाचं आहे" रमाने त्याला उत्तर दिलं. सगळ्यांनी तिच्याकडे हसत बघत माना झुकावल्या.
तेवढ्यात एक-दोन गोऱ्या मुली त्यांच्या टेबलशी येऊन थांबल्या आणि चर्चा थांबली. त्यांनी सगळ्यांचं जेवण झालं का म्हणून चौकशी केली. त्यांना ट्रेडीशनल इंडियन ड्रेसमधल्या कपलचे फोटो काढायचे होते. जीत आणि आदित्यने एकमताने राजला ढकललं.मुलींमध्ये बरीच चर्चा होऊन रमाला पुढे पिटाळलं गेलं. रमा पुढे आलेली बघून राजने आदित्यला खूण केली. आदित्यने त्याच्याकडे न पाहिल्यासारखं केलं आणि तो दुसरीकडे बघत बसला. रमाबरोबर फोटो काढला गेल्यावर राज मनात सुखावला. सगळे निघायला उठत असताना जीतने सगळ्यांना थांबवलं.
"अरे हो,एक अपडेट द्यायची राहिली. नितीनचा फोन आलेला...तो येतोय...त्याने तुझा नंबर घेतलाय आदित्य,तो तुला फोन करणारे..सो आपल्याला अपार्टमेंटसाठी माईकला सांगायला हवं वेळेवर"
"अरे हो,पण अनिताचं विसाचं काम झालं नाहीये अजून. म्हणजे तिने काहीच कळवलं नाहीये.नितीन येतोय ते ठीके पण मग रमाचं काय?" दर्शुने विचारलं. 
"नितीनचा फोन आलाय फक्त...तो आला की बघूया! रमाला कुणी एकटीला टाकणार नाहीये"आदित्यने उत्तर दिलं आणि प्रतिक्रियेची वाट न बघता तो वळला. तो चालायला लागलेला बघून सगळ्यांनी माना वळवून रमाकडे अपेक्षेने पाहिलं. ती काही उत्तर न देता सगळ्यांकडे बघत राहिली.
 
घरी आल्यावर आवरून रमा बाहेर आली तेव्हा आदित्य हॉलमध्ये क्लिनिंग करत होता.
"हे काय मधूनच?" तिने विचारलं.
"अगं,दिवाळी आली ना? थोडी स्वच्छता करतोय.." आदित्यचं उत्तर.
"अरे बापरे..आत्तापासून?" 
"आता मी प्लांड, अरेन्जड व्हायचं ठरवलं आहे"
"बरं..पण हा साक्षात्कार आज अचानक कसा झाला?"
"रमा, मला आज आपल्या सगळ्या चर्चेतून जाणवलं की तुम्ही सगळे ऑर्गनाईझ्ड आहात..फोकस्ड आहात...राजची मतंसुद्धा कितीही नकारात्मक असली तरी त्याच्या डोक्यात काहीतरी प्लान आहे..म्हणजे पीएचडीनंतर काय करायचं हे त्याला माहित नाही आणि म्हणून त्याला लग्न करून एका अनोळखी मुलीची जबाबदारी घ्यायची नाहीये..माझं असं कधीच काहीच नव्हतं. आय मीन मला आठवतंय की अमृताला मी सहज म्हणून टाकलं होतं की 'चल माझ्या घरी'..कधीच कसला विचार केला नाही..प्लानिंग केलं नाही...सुदैवाने अमृताच्या बाबतीत सोडून सगळं नीट झालं सुद्धा...आता विचार केला तर जाणवतं की अमृताच्या बाबतीत पण जे झालं ते चांगलंच झालं तिच्यासाठी...माझा तिच्याबद्दलचा राग कधी जाणार नाही पण ठीके...आय विल मूव्ह ऑन...ती म्हणाली तसं"
"गुड, मला आनंद आहे की तू सिरीअसली विचार करतो आहेस सगळ्याचा.."
"हं..म्हणजे हे पी.एच.डी., रिसर्च..तू म्हणालीस तसं..पाट्याच टाकायच्या असल्या तरी त्या नीट टाकायला हव्यात..आणि हो, आधीच सांगून टाकतोय की मी प्रामाणिक संकल्प केला आहे...पण म्हणून उद्यापासून माझी प्रत्येक हालचाल ऑर्गनाईझ्ड असेलच असं नाही.."
"हं" रमाने हसून मान डोलावली. तिने कपाळावर लावलेली टिकली तशीच होती आणि केससुद्धा तसेच बांधलेले होते. आदित्यला 'संध्याकाळची रमा' आठवली.
"रमा-" तो थांबला.
"बोल ना.."
"तू संध्याकाळी खूप छान दिसत होतीस.."
"हं.." तिचं एवढंच उत्तर. दोघेही काही न बोलता तसेच उभे राहिले.
"मी आवरून घेते.." ती आत जायला लागली.
"रमा-" त्याने पुन्हा हाक मारली.
"काय?" ती त्याने हाक मारायची वाट बघत असल्यासारखीच चटकन मागे वळली.
"श्रीधरचे फोटोस बघितले मी काल..तुम्ही दोघे चांगले दिसता बरोबर.."
"हं.." ती पुन्हा वळली.
"राज पण वेडा आहे ना.." त्याला तिला जाऊन द्यायचं नव्हतं. तो काहीतरी विषय काढत राहिला.
"का?"
"म्हणजे त्याला असं वाटतं की कॉलेजमध्ये असताना त्याला कुणीतरी भेटली असती, तो तिच्यात इनव्होल्व्ह झाला असता तर आत्ता तो सुखी असला असता...माझ्यामते ही भावनिक गुंतागुंत धड कळतसुद्धा नाही त्या वयात..आत्ता लक्षात येतंय की हे सगळं समजायला,उमगायला नेसेसरी असणारी मॅचुरिटी आणि अनुभव आपल्याला त्या वयात असणं शक्यच नसतं...दुर्दैव हेच आहे की हे कुणी सांगून,शिकवून पटत नाही,अनुभवावं लागतं" त्याने रमाची नजर चुकवली. 
"मग तुला वाटतं की आता आपण रिलेशनशिप्स समजून घेण्याइतके मोठे आणि मॅचुअर झालोय?" तिने विचारलं. आदित्यने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच बघत होती. उत्तराची अपेक्षा करत!  

क्रमशः 

4 comments:

nik said...

cute story.waiting....

Unknown said...

good going.waiting for next part

Chaitanya Joshi said...

@Nik: Thanks...just posted the next part :)

Chaitanya Joshi said...

@Kunal: I guess this is your first comment on the blog..so welcome :)have just posted next part.
Keep visiting..cheers :)