आत्तापर्यंत:
आदित्य लहानपणापासून तीन-चार ठिकाणी राहिला होता. आजूबाजूला माणसं असणं आणि अचानक त्यांच्यापासून दूर जाणं ही गोष्ट त्याला नवीन नव्हती. माणसं लांब जातात म्हणून त्यांच्या जवळ जायचंच नाही असं मात्र त्याने कधी केलं नाही पण लांब असणाऱ्या माणसांबद्दल हळहळ करणं व्यर्थ असतं हे मात्र त्याला पक्कं कळलं होतं. रमा शाळा-कॉलेजच्या ट्रिप्स सोडून कधी २-३ दिवसांच्यावर तिच्या घरापासून लांब राहिली नव्हती. अमेरिकेतल्या 'नव्या नवलाईचे नऊ' दिवस संपल्यावर तिला होमसिकनेस जाणवायला लागला. 'सोशियल नेट्वर्किंग' या प्रकारचा तिला त्रास व्हायला लागला. भारतात सणांचे दिवस सुरु झाले होते. फेसबुक, मेल, चॅट सगळीकडे भेटणारे मित्र-मैत्रिणी तिला त्यांच्याकडे होत असणाऱ्या सेलिब्रेशनसबद्दल सांगत होते. आपण कितीही बरा स्वैपाक करत असलो तरी आईच्या हातच्या वरण-भाताची चवसुद्धा आठवून रडायला येत होतं. आदित्यबरोबर राहून आईला फसवत असल्याचं फिलिंग सगळ्यात वाईट होतं. मुंबईच्या गर्दीला, गोंगाटाला ती खूप मिस करत होती. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक करायचे का म्हणून विचारायला मेघा आली आणि रमाच्या डोळ्यात पाणी आलं.
"माझ्या घरी ५ दिवसांचा गणपती असतो. माझे काका-काकू, सगळे भाऊ-बहिणी, मावशी, आत्या सगळे सगळे जमतात आमच्या घरी..मी खूप मिस करणारे या वर्षी सगळं"
"रमा, सवय करून घे आता! मला माहितीय की असं म्हणणं सोप्पं आहे..पण आम्हीसुद्धा वर्ष-दोन वर्षापूर्वी या फेसमधून गेलोय..अमेरिकेत आल्यावर तावून-सुलाखून निघणं वगैरे असतं ना हा त्यातला मेजर पार्ट असतो.."
"हं..पण...हे फेसबुक, मेसेजेस...सतत आठवण करून देतात गं त्याची..."
आदित्य गप्पा ऐकून त्याच्या खोलीतून बाहेर आला.
"कोणाची आठवण येतेय तुला??" त्याने थट्टा करायच्या स्वरात विचारलं. ती मान खाली घालून काहीच उत्तर न देता गप्प बसून पाहिली. मेघाने डोळे मोठे करून त्याला दटावलं.
"तुमचे गर्ल टॉक्स चालू आहेत का?मी आत जातो परत..किंवा जीतकडे जातो" तो उठत म्हणाला.
"आदि-त्य...बस...आम्ही जनरल बोलतो आहोत..." रमाने चटकन सावरूनसुद्धा आदि आणि त्य मध्ये आलेला पॉझ मेघाच्या लक्षात आलाच. फक्त तिला हे माहित नव्हतं की आदित्यसाठीसुद्धा ते नवीन होतं.
"ओके..काय बोलताय तुम्ही?" बेल वाजली. आदित्य दार उघडायला गेला.
"स्पीक ऑफ द डेव्हिल.." तो आत येणाऱ्या जीतला म्हणाला.
"डेव्हिल? निदान शंभर वर्षं आयुष्य असं तरी म्हणायचं.." जीत आत आला.
"तू काय घेऊन आला आहेस?" आदित्यने विचारलं.
"फ्री डोनट्स..बिझनेस बिल्डींगमध्ये वाटत होते..तब्बल ४ मिळाले..राज खाणार नाही..सो मी विचार केला की तुझं वजन वाढवावं थोडं.."
"राज डोनटस खात नाही?"
"सध्या तो सिरीअसली वजन कमी करायच्या मागे आहे..पुढच्या समरमध्ये घरी गेला तर मुली बघायचे कार्यक्रम होणारेत...आणि तो फ्री फूड खात नाही...ते म्हणे क्वालीफायर पास करून वर्षानुवर्ष पी.एचडी करत सडणाऱ्या लोकांचं लक्षण आहे"
"आवरा कुणीतरी त्याला.."
"कठीण आहे ते..त्याला जाऊ दे..प्लेट घे तू..गरम करुया ना??" त्याने विचारलं. मेघा आणि रमा या दोघांकडे काही न बोलता बघत होत्या. जीतचं त्यांच्याकडे लक्ष गेलं.
"काय पाटकर? तुम्ही इथे कुठं?" त्याने मेघाला विचारलं.
"पाटकर?" रमाला प्रश्न पडला.
"सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझं नाव मेघा पालकर आहे..मेधा पाटकर नाही..पण ते याला कळत नाही.." मेघा रमाला म्हणाली.
एकमेकांची थट्टा करत खाणं आणि चहा झाल्यावर पुन्हा भारतातले सण हा विषय चर्चेत आला.
"जीत, रमा म्हणते की तिला फेसबुक, मेसेजेस, फोटोस यांचा त्रास होतो..तुझं काय मत आहे यावर?" मेघाने अर्थपूर्ण हसत जीतकडे पाहिलं. तिला तो काय उत्तर देणार याची कल्पना होती.
"धत तेरी..त्रास कसला आलाय त्यात..रमा खूप सोप्पं आहे! ते लोक त्यांचा आनंद साजरा करतात, आपण त्यात वाईट वाटून घ्यायचं नसतं..ते काही आपल्याला जळवायला फोटोस टाकत नाहीत..आणि जे टाकतात त्यांच्यासाठी आपण टाकू की फोटो..."
"आपण कसले फोटो टाकणार?"
"आपण करू की इथे चतुर्थी!! चांगले रग्गड उकडीचे मोदक करू चतुर्थीला...विकेंडला गाडी बुक करू आणि महाराष्ट्र मंडळाच्या गणपतीला जाऊन येऊ..शेकड्याने फोटो काढू..यंदा तर ७ जण आहोत..राजची मोठ्ठी गाडी चालवायची हौस त्याला भागवता येईल..तुमचं फिरणं होईल...गाय्स..आपण अमेरिकेत आहोत..भारतातल्या लाखो लोकांना इथे यायचं असतं..आपण 'चोझन वन्स' आहोत..आणि आपण ते फुटकळ फोटोस पाहून दुःख करायचं? नाय..नो..नेव्हर..आणि दुसरं असं की आपण ते सगळं कायमसाठी सोडून आलो नाहीये ना? कधीतरी आपण परत जाऊ..कदाचित पुन्हा सेटल व्हायला नाही..पण तरी..कधीतरी गणपती, दिवाळी हे सगळं परत भारतात साजरं करूच की.."
"हं.." आदित्यने मान डोलावली.
"बाय द वे..तुला लैच वाईट वाटतंय का? तर आपण एक काम करूया..आपली मच पेंडिंग मुव्ही नाईट आज करायची का?"
"मला आणि दर्शुला चालेल...मनिला विचारते...राज असेल ना?"
"त्याचं काय? तो निशाचर माणूस आहे! त्याला सकाळी सातला मिटिंग असेल तरी तो येईल.."
"मग ठीके...चालेल..कुणाच्या घरी?"
"इथेच येता का?" आदित्यने विचारलं.
"इथेच येता का?" आदित्यने विचारलं.
"इथे?"
"हो..मी नवीन स्पीकर्स घेतले आहेत..ते पण टेस्ट होतील..मुव्हीस घेऊन या फक्त..नाहीतर माझ्याकडे जे असेल ते पाहावं लागेल.."
रात्री एकत्र सिनेमे बघायचं ठरलं. जीत आणि मेघा निघून गेले.
"मेधा पाटकर...हा हा हा" आदित्य स्वतःशीच हसत म्हणाला. त्याचं लक्ष त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसणाऱ्या रमाकडे गेलं.
"भारी होता ना?" त्याने हसत विचारलं. रमा त्याच्या हसण्यात मोकळेपणाने सामील झाली. तो अजून मोठ्याने हसायला लागला-
"सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझं नाव मेघा पालकर आहे..." तो खिदळत मेघाची नक्कल करत म्हणाला. रमाला खूप हसायला यायला लागलं.
"आदि पुरे..." तिने परत आदि म्हटलेलं ऐकून तो एकदम हसायचा थांबला. तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याने उत्तरादाखल भुवया उंचावल्या.
"या नावाने हाक नको मारू का?" तिने विचारलं. खरंतर त्याची काहीच हरकत नव्हती. घरीसुद्धा त्याला त्याच नावाने हाक मारायचे. पण का कुणास ठाऊक हा विषय असा बोलून झाल्यावर त्याला बरं वाटायला लागलं.
"सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझं नाव आदित्य-" तो बोलता बोलता पुन्हा हसायला लागला आणि वातावरणात निर्माण झालेला तणाव निवळला.
"तुला घरची आठवण येत नाही का रे?" तिने भावूक होत विचारलं.
"कुठल्या घरची...?" त्याचा तितकाच निर्विकार प्रश्न!
"कुठल्या म्हणजे? अशी किती घरं आहेत तुझी?"
"पुणे, मुंबई, श्रीवर्धन, सोलापूर.."
"मी समजले नाही"
"रमा, मी हे सगळं फार लहान असल्यापासून अनुभवतो आहे...हे सगळं म्हणजे घरापासून लांब जाणं ,तिथल्या माणसांची, त्यांच्या सोबत घालवलेल्या सणांची आठवण येणं...परचुरेंकडे फिरता गणपती असतो...दरवर्षी एका भावंडाच्या घरी! आम्ही श्रीवर्धनला होतो तेव्हा आमच्या घरी होता..दीडच दिवस असतो म्हणून सगळे हमखास सुट्टी काढून येतात..सगळ्यांना कोकण खूप आवडलं..हरिहरेश्वरचा समुद्र, श्रीवर्धनमधल्या आमराया...त्यावर्षी दिवाळीसुद्धा आमच्या घरी झाली..नंतरच्या वर्षी मुंबईत आलो तेव्हा दीड-दोन वर्ष कुणी फिरकलं पण नाही...एकीकडे आपण म्हणतो की पिकनिकला कुठे गेलो ते महत्वाचं नाही पण कुणासोबत गेलो ते महत्वाचं..तरीसुद्धा चांगली कंपनी आहे म्हणून आपण चार-धामची यात्रा नाही करू शकत किंवा मुंबईच्या धावपळीत मजा नाही करू शकत...जागांना तेवढंच महत्व असतं..सोलापूरच्या घरच्या मागचं वडाचं झाड..तिसरी-चौथीत सूर-पारंब्या खेळायचो तिथे..मग श्रीवर्धनला आलो..तिथे वड नव्हता..पण समुद्राच्या प्रेमात पडलो..पोहायला शिकलो..मग मुंबई...आय जस्ट हेटेड इट इन द बिगीन्निंग...माणसं, बिल्डींग्स, एकमेकांशी हिंदीत बोलणारी माणसं..मग हळूहळू त्याची सवय झाली..ते सगळं आवडायला लागलं..त्यातली गम्मत कळायला लागली..आणि आता गेली सात-आठ वर्ष पुणे...संस्कृती, शिक्षण, सो कॉल्ड महाराष्ट्रीयन सभ्यतेचं माहेरघर...पण स्वतःला पुणेकर म्हवून घेण्यातला माज..आय मीन इट..माज...त्याची गंमत वेगळी..तुम्ही सगळी माणसं जेव्हा भारताची आठवण येते म्हणता ना तेव्हा तुम्हाला फक्त मुंबईची, पुण्याची, नाशिकची, थोडक्यात तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाची आठवण येत असते..दिल्लीच्या थंडीचे, गुजरातच्या गरब्याचे फोटो बघून आपल्याला कुणाला काहीच वाईट वाटणार नाही! अ...तू मगाशी विचारलंस ना? मला घरची आठवण येत नाही का? येते..पण ते मला नवीन नाहीये..एक सांगू..सोलापुरचं वडाचं झाड आठवलं की जाणवतं..कितीही विस्तारलो, पसरलो तरी आपलं आपल्या मुळांशी असणारं नातं तुटत नाही...घट्ट जोडलेलं असतं ते! दुसरीकडे श्रीवर्धनचा समुद्र नेहमी किनाऱ्यापासून खोल आत पोहायला प्रवृत्त करणारा..सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं क्षितीज..नेहमी खुणवायचं..गंमत अशी आहे की हे सगळं आठवलं की मग आठवण आल्याचं दुःख होत नाही!"
"आदि..मला माहित नव्हतं की तू या सगळ्याकडे इतक्या पोएटिकपणे बघतोस?"
"पोएटिक?" तो हसला.."रमा, तो समुद्र, ते वडाचं झाड ही माझ्या आयुष्यातली श्रद्धास्थानं आहेत..आठवली की बरं वाटतं"
"किती फ्लेक्सिबल आहेस तू.."
"कधी तुला मी फ्लेक्सिबल वाटतो तर कधी पार डळमळीत वाटतो...या फ्लेक्सिबिलीटीच्या भानगडीत माझा डिपेन्डंस वाढला असेल बहुतेक असं जाणवतं आहे मला!!"
दोघे काही न बोलता बसून राहिले..कधी एकमेकांकडे तर कधी शून्यात बघत!
"चला..स्वैपाक करायला हवा..सगळे येतील जेवून..पाटकर बाई चिडायच्या..." तो उठत म्हणाला.
तिला खरंतर उठायची इच्छा नव्हती पण पर्याय नव्हता.
एका घरात दिवसातला जवळपास वेळ एकत्र घालवायला लागला की आपुलकी, माया, प्रेम, बंधन सगळं येतंच...जस्ट लाईक दॅट! मग राहणाऱ्यांची इच्छा असो किंवा नसो! रमा आणि आदित्यचं छान नातं तयार झालं होतं. त्या नात्याला कोणतंही नाव द्यायला ते दोघेही तयार नव्हते. आपण किती वस्तुनिष्ठ आहोत हेच ते एकमेकांना आणि पर्यायाने स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. एकीकडे मागे अर्धवट सोडलेली नाती होती आणि दुसरीकडे नवीन बनणारी नाती! अर्थात असं होण्याला जबाबदारसुद्धा ते दोघेच होते. श्री गेले कित्येक महिने रमाच्या उत्तराची वाट बघत होता. तिने त्याला अडवून धरलं नव्हतं पण तो रमाला सोडायला तयार नव्हता. अमृताने आदित्यशी गेल्या दीड महिन्यात काही संपर्क केला नव्हता. बहुतेक तिने काही पर्याय शोधला होता. अमृताला त्याने एक-दोन मेल्स केल्या होत्या. तिने रिप्लाय केला नव्हता. एकमेकांना बाकी सगळं सांगता येणं शक्य होतं पण हा विषय बोलायचा नाही असं ठरवल्यामुळे गोची होती.
रात्री मुव्ही नाईट प्रकाराला सगळे जमले. कोकच्या बाटल्या, वेफर्स, उशा-पांघरुणं अशी सगळी जय्यत तयारी होऊन मग काय बघायचं ठरवण्यात अर्धा तास गेला. शेवटी आदित्य आणि दर्शुने सोडून कुणीच टॉय स्टोरी पाहिले नसल्यामुळे ते बघायचं ठरलं. दुसरा भाग अर्धवट बघून झाला आणि मनीषाला घरून फोन आला म्हणून ती निघून गेली. दुसरा भाग जेमतेम बघितला तोपर्यंत जवळपास सगळे ढेपाळले होते.
"चला..शेवटचा कधीतरी नंतर बघू.." मेघा
"अरे काय..तुम्ही सगळे वेळ होता म्हणून आलेलात ना? आणि दोन पाहिले तर तिसरा..दर्शु सांग यांना" -आदित्य
"हो रे..तिसरा खूपच गोड आहे"
"आम्ही नाही कुठे म्हणतोय..परत बघू कधीतरी..."
"ए..तुम्ही ठरवा..मी जाते झोपायला..." रमा जांभई देत म्हणाली.
"घ्या..हे यजमान चालले आणि आपण काय सिनेमा बघणार?"
"अरे हा आहे ना..मी जाते रे..मी रोज या वेळी झोपलेले असते.." ती पेंगुळली होती.
रमाला जाग आली तेव्हा बाहेर चालू असणारा स्पीकर्सचा आवाज बंद झाला होता. ती पाणी प्यायला उठली तेव्हा तिने नजर टाकली तर एकटा आदित्य कानात हेडफोन्स टाकून सिनेमा पाहत होता. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याने गुडघ्यावर बसून दिवा लावला.
"तू का उठलीस?"
"पाणी प्यायला..सगळे गेले?"
"हं..राज थांबला होता..आत्ताच दहा मिनिटापूर्वी गेला.."
"हं..किती वाजले..??"
"तू झोपायला जाऊन एकच तास झालाय..."
"ओके..आणि तू बघितला आहेस ना मुव्ही?"
"हो..पण री-रन..ते पण एका रात्रीत तिन्ही..लई भारी..मी पूर्ण बघूनच झोपेन"
"तुला खरंच मुव्हीसचं इतकं वेड आहे की.."
"वेड आहेच..पण टॉय स्टोरीस भारी आहेत अगं..तू पाहिलेस की दोन.."
"दुसरा थोडासा झोपेतच पहिला मी" ती पाण्याचा ग्लास विसळत म्हणाली. तो काहीसा खट्टू होऊन तिच्याकडे पाहत होता.
"अजून किती वेळ आहे संपायला?"
"विसेक मिनिटं.."
"ठीके..मी पण बघते..माझी झोप गेलीय.."
"अशी काही झोप जात-बित नाही..तू झोप गुपचूप...मला एकटा मुव्ही बघण्याचं अजिबात वाईट वाटलेलं नाहीये..आणि नंतर सावकाश पहिल्यापासून बघ.."
"मला नंतर बघायचा उत्साह तेवढाच आहे..आत्ता बसले तर चालणार नाहीये का?"
"ओके..बस..मी काय मनाई करणार?आपण दोघेही अर्धं-अर्धं रेंट भरतो"
"गुड.."
सिनेमा संपला तेव्हा अर्धवट लवंडलेल्या रमाचा डोळा लागला होता. मुव्हीच्या मानसिक कौतुकातून बाहेर आल्यावर आदित्यचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो थबकला. तिला उठवायची आणि तिथून उठायची त्याला इच्छा नव्हती पण पर्याय नव्हता. त्याने त्याच्या खोलीतून एक शाल आणली आणि हलकेच तिला पांघरली.
'झोपून द्यावं का तिला इथेच?' त्याचा निर्णय होईना. तिची झोप त्याला जराशी डिस्टर्ब झाल्यासारखी वाटली आणि त्याने निर्णय घेतला.
"रमा" त्याने हळू आवाजात हाक मारली. रमा दचकून जागी झाली.
"संपला??" तिने झोपेत विचारलं.
"नाही..तुला झोप लागली म्हणून मीच बंद केला..नंतर पहिल्यापासून बघू.." आदित्य स्वतःशीच हसत म्हणाला.
रमाचं तिच्या अंगावर आलेल्या शालीकडे लक्ष गेलं. आदित्यने लगबगीने पुढे होत ती शाल ताब्यात घेतली.
एकमेकांना 'गुड नाईट' म्हणून खोलीत आल्यावर रमाची झोप पुन्हा एकदा उडाली होती. तिला वाटत होतं तेवढं सोपं नव्हतं काहीच! यापुढे आयुष्यात प्लान न केलेली कुठलीच गोष्ट करायची नाही. तिने हा विषय श्रीकडे बोलायचं ठरवलं.
'बोलायला तर हवंच..नंतर राहून गेलं असं वाटायला नको' असा विचार करत आदित्य झोप यायची वाट बघायला लागला.