Pages

Monday, November 19, 2012

जस्ट लाईक दॅट १७


आत्तापर्यंत:

रविवारी सकाळी सकाळी मनिषाचा फोन आल्यावर रमा थोडी चपापलीच. मनिषाशी तिची चांगली ओळख वगैरे असली तरी आत्तापर्यंत तिला मनिषाने असा भल्या सकाळी फोन केला नव्हता. तिने विचार करतच फोन उचलला.
"
रमा, तुला एक विचारायचं होतं"
"काय गं? सगळं ठीके ना? सकाळी सकाळी फोन?"
"अगं, मला आज शॉपिंगला जायचं होतं..तू येशील का बरोबर?"
"मी? येईन की.."
"म्हणजे मला तुझा ड्रेसिंग सेन्स आवडतो..तुझी चांगली मदत होईल सिलेक्शनला..मला बरीच खरेदी करायची आहे....दोन आठवडेच राहिले" 
रमाला आठवलं. मनिषा दोन आठवड्यांनी लग्न करायला घरी जाणार होती. तिच्या लग्नाचं कळलं त्याच दिवशी तर तिने श्रीला फोन करून आदित्यबद्दल सांगितलं होतं.
"
तुझी शॉपिंग करायची आहे की अजून कुणाची?"
"
अगं, मयूरच्या बहिणींसाठी काहीतरी घेऊन जायला लागणारे आणि बाकी पण बरीच खरेदी आहे...वेळ जाईल तसा..तुला चालेल ना?"
कोणती मुलगी शॉपिंगला जायला नाही म्हणणारे?
"हो..चालेल की..तू मेघा, दर्शुला नाही विचारलंस का? आणि प्रिया?"
"प्रिया आणि मेघाला काम आहे..दर्शु येईल बहुतेक..."
"ओके...भेटू मग..कळव कधी निघायचं आहे ते"   
आदित्य झोपेतून उठून बाहेर आला तेव्हा रमा तयार होऊन पुस्तक वाचत बसली होती.
"
आज रविवार आहे ना?" त्याने झोपेतच कन्फ्युस होत विचारलं.
"हं" तिने मान डोलवली. तो तसाच तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिला.
"मग तू अशी तयार होऊन का बसलीयस?"
"मनिषाबरोबर बाहेर जायचंय"
"ओके.." तो पुन्हा त्याच्या खोलीकडे वळला.
"आदि, तू पुन्हा जाऊन झोपणारेस?"
"अ..नाही..उठलोय मी..." त्याने जांभई देत उत्तर दिलं. 
"मी चहा केलाय तुझ्यासाठी..."
"ओके..थॅंक्स...दुपारी बाहेरच खाणार असाल ना काहीतरी?"
"माहित नाही पण बहुतेक खाऊ..तुला काही आणायचं आहे का?"
"फोन कर मला..."
"ओके.."
"मी जातो आवरायला..मी येईपर्यंत तू गेली असशील...बाय.."
"बाय"
आदित्य पुन्हा खोलीत जाऊन आडवा पडला आणि त्याला झोप लागली. तासाभराने तो नीट जागा झाला. रमा निघून गेली होती. त्याने आवरून चहा गरम केला आणि सवयीप्रमाणे लॅपटॉप उघडून बसला. मेलबॉक्समधल्या तिसऱ्या मेलकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो चपापला. त्याने मेल उघडली.

आदित्य,
बिलेटेड हॅप्पी दिवाली. कसा आहेस? तुझ्याशी बोलायचं होतं. जमलं तर फोन करशील? वाट बघतेय..
अमृता 

आदित्यला क्षणभर काय करावं तेच सुचेना. जवळपास दीड महिना अस्वस्थपणे घालवल्यावर तो अमृताबाबत घडलेल्या प्रसंगातून बाहेर पडत होता. अमृताने त्याच्याशी गेल्या चार-साडेचार महिन्यात अजिबात संपर्क केला नव्हता आणि आता अचानक तिचा मेल. त्याने फोन करायचा नाही असं मनाशी ठरवलं खरं पण दहा मिनिटांनी त्याने घड्याळ पाहिलं आणि खूप उशीर झाला नाहीये अशी स्वतःचीच समजूत घालत अमृताला फोन लावला. तिने फोन उचलला.
"अमृता, आदित्य बोलतोय.."
"हाय..थॅंक्स कॉल केल्याबद्दल..मी अजिबात शुअर नव्हते की तू फोन करशील.."
"आणि मी शुअर नव्हतो की तुझा फोन लागेल..मला वाटलं होतं की आत्ता तू 'त्याच्याशी' बोलत असशील आणि त्या दिवशीसारखा माझा फोन वेटिंगवर राहून कट होईल.." तो तुटकपणे म्हणाला.
ती काहीच बोलली नाही.
"तुला काहीतरी बोलायचं होतं" आदित्यने विचारलं. 
"अ..हो..आदि..माझी एंगेजमेंट ठरलीय...पुढच्या महिन्यात..." 
"...ओह..ग्रेट...अभिनंदन.." त्याने खूप वेळाने उत्तर दिलं. ती पुन्हा काही बोलली नाही.
"आदित्य, तुला आता तरी पटतंय ना की मी लाँग डिस्टंस रिलेशनला का नाही म्हणत होते?"
"मला काही पटण्या- न पटण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि आता आपण ही गोष्ट डिस्कस करून उपयोगसुद्धा नाहीये.."
"मी तुला फसवलं हे ओझं घेऊन मला लग्न नाही करायचं.."
"अमृता, तू मला फसवलंस असं मी कधीच म्हणणार नाही. पण आपण एकमेकांशी खोटं बोललो..आपल्यात चूक कोण हे ठरवण्याची ही वेळ नाही...तू कुठल्या ओझ्याखाली लग्न करावंस अशी माझी अजिबात इच्छा नाही..असं म्हणतात की झालेल्या सगळ्या गोष्टी तशाच का घडल्या याची स्पष्टीकरणं नंतर आपोआप मिळतात आणि देन इट ऑल मेक्स सेन्स..जस्ट लाईक दॅट"
"आदि, जे काही झालं..त्याबद्दल खूप खूप सॉरी"
"तसं असेल तर मीपण सॉरी म्हणतो...अजाणतेपणी मीही तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंच की.."
"नाव काय तिचं?" 
"रमा. रमा फडके"
"हं...मुंबईची आहे ना ती?"
"हो..का?"
"नाही...सहज चौकशी केली..आदित्यमला विचारायचा काहीच हक्क नाहीये...पण तू आणि रमा एका घरात-"
"हो..एका घरात राहतो...वेगवेगळ्या खोलीत.." त्याने तिचा प्रश्नाचा रोख ओळखून उत्तर दिलं.
"मला कधीच वाटलं नव्हतं की तू एखाद्या मुलीबरोबर राहशील..इथे मला कधी घरीसुद्धा घेऊन गेला नाहीस.."
"तुला माझा स्वभाव माहितीय अमृता..मी अजूनही माझ्या घरी तिच्याबद्दल सांगितलं नाहीये...निव्वळ तडजोड म्हणून आम्ही एकत्र राहायला लागलो. तिनेही घरी फक्त तिच्या वडलांना सांगितलंय..सांगायचं इतकंच की मी ठरवून काहीच वागलो नाही" त्याने पुन्हा टोमणा मारला.
"आदि, मीसुद्धा काहीच ठरवलं नव्हतं रे...खरंच..आणि तूच म्हणालास ना आत्ता की झालेल्या सगळ्या गोष्टी तशाच का घडल्या याची स्पष्टीकरणं नंतर आपोआप मिळतात आणि देन इट ऑल मेक्स सेन्स" तिने उत्तर दिलं. त्याला अजूनही तिचा थोडा राग येत होता.
"बाय द वे अमृता, तू नेहमी म्हणायचीस ना की मी निर्णय घेत नाही, जबाबदारी घेत नाही.रमाबरोबर राहून मी निदान तो प्रयत्न करायला शिकलो.ती खूप कंपोस्ड, प्लांड मुलगी आहे.तिचं नेहमी काय वागायचं,बोलायचं हे ठरलेलं असतं. तिच्याबरोबर राहून कळत-नकळत मीसुद्धा बदलतोय थोडा.आयुष्याकडे,करिअरकडे सिरीअसली बघतोय. तू ज्याला ओळखायचीस, जो तुझ्यात गुंतला तो आदित्य मी राहिलेलोच नाही....हां, हे सगळं दोन-तीन वर्षांपूर्वी केलं असतं तर आज आपण दोघे-" त्याने वाक्य अर्धवट सोडून दिलं. तिला चिडवण्याच्या प्रयत्नात तोच अस्वस्थ झाला.  
"ठीके आदित्य...माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही...हे सगळं असंच होणार होतं बहुतेक"
"हं"
"मग आता काय करणारेस पुढे? घरी परत कधी येणारेस?" तिने विषय बदलला.
"घरी परत एवद्यात नाही..आत्ता तर आलो मी चार-पाच महिन्यांपूर्वी..आणि पुढे काय करणारे विचारत असशील तर सध्यातरी सिरीअसली पीएचडी करायचं ठरवलंय कारण आता मला काहीच बदल करणं शक्य नाही.याच्यापुढे आणि याच्यापेक्षा जास्त चांगलं शिकताच येत नाही. त्यामुळे कुणी काही नवीन सल्ला द्यायचा प्रश्न नाही. रिसर्चमध्ये इंटरेस्टही डेव्हलप होतोय..काहीतरी चांगलं करायची इच्छा आहे..बघू..बाकी स्वैपाक करायला शिकलोय.."
"अरे वा..मग चिकन करतोस की नाही?" आदित्य घरी न सांगता बाहेर चिकन खायचा त्यावरून अमृता त्याला नेहमी चिडवायची.
"रमाच्या राज्यात चिकन नाही होत..पण एक-दोन थाई डिशेस शिकलोय..."
"छान छान.." ताण बराच निवळला होता आणि दोघे थोड्या नॉर्मलपणे गप्पा मारायला लागले होते.
"तुझ्या साखरपुड्याची तारीख काय ठरली?"
"पुढच्या महिन्याची वीस"
"ग्रेट...पुन्हा एकदा अभिनंदन" 
"हं"
"चलो..ठेवू मी फोन...बराच उशीर झाला असेल ना?"
"हं..आदित्य, एक सांगू?"
"सांग ना.."
"गैरसमज करून घेऊ नको..पण...यावेळी रमालातरी जाऊन देऊ नको.."
"सॉरी?"
"मला माहित नाही आदित्य की मी बरोबर विचार करते की चूक? म्हणजे आपण लाँग डिस्टंस रिलेशन न ठेवणं योग्य आहे हे जसं मला वाटलं तसंच तू रमाला सोडू नयेस असंही आत्ता वाटतंय...सो मी तुला सांगून टाकलं..मी काहीतरी चुकीचंसुद्धा बोलले असेन...पण..एनीवेज..मी ठेवते आता..बाय"
"बाय..गुड नाईट"  
आदित्यने फोन ठेवला आणि खिडकीबाहेर सुन्न होऊन पाहत राहिला.
'अमृताला फोन ठेवता ठेवता असला सल्ला द्यायची काय गरज होती? रमाला सोडू नकोस..मला नाहीये इच्छा तिला सोडायची...पण आपल्या मनाला पाहिजे तसं नाही होऊ शकत जगात..माझा असा विचार करणं मॉरली योग्यसुद्धा नाही..मी आणि रमा निव्वळ रूम मेट्स, चांगले फ्रेंड्स आहोत..बास..'
तो वैतागला आणि पुन्हा खोलीत जाऊन आडवा पडला.

मॉलच्या फूडकोर्टमध्ये जागा शोधून तिघी बसल्या.
"मनी, तू खूप एक्साइटेड असशील ना? सगळी तयारी झाली घरी?" दर्शनाने विचारलं.
"हो..म्हणजे हे सगळं तसं घाईतच होतंय..पण मयुरसुद्धा सहा महिन्यात यायचा आहे इथे...सो घरच्यांनी घाई करायला लावली"
"भारी..तू किती दिवस आहेस लग्नानंतर तिथे?"
"अगंलग्न कसलं?? दगदग होणारे फक्त...लग्नाच्या आधी दोन आठवडे जातेय मी आणि लग्न झाल्यावर आठवडाभरात परत.."
"पण तो येतोच आहे की सहा महिन्यात..." आपण काहीच बोलत नाहीये हे जाणवल्यावर रमा एक वाक्य बोलली.
"खरंय...आम्ही गेले दोन-अडीच वर्षं एकमेकांपासून लांब राहतोय खरे..पण लग्न झाल्यावर आम्हाला नाही वेगळं राहायचं जास्त दिवस..मुंबईत आम्ही जेमतेम वर्षभर एकत्र राहिलो..त्यातही शेवटचे दोन महिने त्याचा एक मित्र पण होता आमच्याबरोबर राहत...मला एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून जागा मिळत होती तेव्हा..पण आम्ही ठरवलं की एकत्र राहायचं..त्याचा मित्र आल्यावर ऑकवर्ड झालं थोडे दिवस पण आम्ही दोघे बरोबर होतो हे महत्वाचं..गेल्या वर्षी तो इथे आला तेव्हा आम्ही ते एकत्र राहणं पुन्हा अनुभवलं..आम्ही एकमेकांना किती चांगले ओळखत होतो,एकमेकात किती गुंतलो होतो हे त्या ७-८ दिवसात जाणवलं आम्हाला..मग त्याने जाऊन घरी सांगितलं..त्याच्या घरच्यांनी पप्पांना फोन करून मला मागणी घातली आणि हिअर वी आर..."
"मस्त" 
दर्शु आणि रमाने माना डोलावल्या. मनिषा तिच्या लग्नाचं,तिच्या नवऱ्याचं कौतुक करण्यात गुंतली होती. रमा आणि दर्शु गुपचूप ऐकून घेण्याचं काम करत होत्या.
"आतासुद्धा सहा महिन्यांनी तो इकडे येणारे...तेव्हासुद्धा आम्ही एकत्र राहणार नाही पण महिन्या-दोन महिन्यांनी तरी एकमेकांना भेटू शकू...कधी एकत्र राहिलोच नसतो तर कदाचित आम्हाला काहीच वाटलं नसतं..एवढंच काय तर आमचं लग्नपण झालं नसतं.."
रमाच्या डोक्यात पुन्हा सगळा गुंता व्हायला लागला होता. मनीषाच्या गोष्टीशी ती पुन्हा एकदा स्वतःला रिलेट करायला लागली होती. तिने सरळ कॉफी घ्यायला जायचं सांगून तिथून काढता पाय घेतला.
"मनी, तू हे सगळं बोलतेयस ठीके...पण मला वाटतंय की तू रमाला उद्देशून बोलते आहेस असं तिला वाटलेलं असू शकतं.."
"म्हणजे?"
"ती आणि आदित्य बरोबर राहतायत ना...तिने तिच्या घरी आईला सांगितलेलं नाही..आम्ही तुझं लग्न ठरल्याचं तिला ज्या दिवशी सांगितलं होतं ना तेव्हा ती तेच आठवून अस्वस्थ झाली होती.."
"मला तर नॉर्मल वाटली..पण तिचं आणि आदित्यचं काही??" मनीषा 
"नाही गं...ती किती अबोल आणि रोखठोक आहे ते पाहिलंयस ना?...ती आणि आदित्य...नाहीच गं...आदित्य बिनधास्त असतो तसा...पण मला तरी वाटतंय की अनिता येणार असल्याचं कन्फर्म झालं की ती लगेच आदित्यला दुसरं अपार्टमेंट बघायला सांगेल.."
"हं" 
रमा कॉफी घेऊन आली आणि विषय बदलला गेला.

'लक्षात ठेव रमा- फार लांबचं प्लानिंग करू नये..कारण ते आपण आपल्या दृष्टीकोनातून करतो..आपले दृष्टीकोण बदलतात..आजूबाजूची माणसंपरिस्थिती सगळंच बदलतं आणि मग नकळत प्लानिंग बदलतं...श्री जवळपास वर्षभरापूर्वी म्हणाला होता. तिने तेव्हा त्याचं बोलणं सिरीअसली घेतलं नव्हतं आणि आता सगळी परिस्थिती विचित्र झाली होती. आयुष्यभर जसं करीअर करायचं तिने स्वप्न पाहिलं होतं, प्लानिंग केलं होतं ते खरं होताना दिसत होतं. पण हा भावनिक गुंता तिच्या प्लानिंगमध्ये कधीच नव्हता आणि तो कधी होईल याचा तिने विचारही केला नव्हता. आदित्यबरोबर राहण्याचा निर्णय सुरुवातीला जरी तडजोड-सोय म्हणून घेतलेला असला तरी स्वतःच्या नकळत तिला आदित्यची सवय झाली होती. अजून महिनाभराने ते दोघे एकत्र राहत नसतील हा विचारच तिला पटत नव्हता. 
"काय विचार करते आहेस?" मनिषाने तिची तंद्री मोडली.
"काही विशेष नाही" तिने उत्तर दिलं. 
दर्शना मेघाने सांगितलेलं काहीतरी घ्यायला गेली होती. मनीषा आणि रमा पार्किंगमध्ये तिची वाट बघत गाडीत थांबल्या होत्या.
"मला मगाशी दर्शु सांगत होती की माझ्या लग्नाची गोष्ट ऐकल्यावर तू अस्वस्थ होतेस..तू आदित्यबरोबर राहत असल्याचं तुझ्या आईला बोलली नाहीयेस ते आठवतं तुला वगैरे.." 
"तसं मी बोलले होते त्या दिवशी पण एवढं काही नाही गं..." रमाने उत्तर दिलं.
"रमा, मी तुला समजून घेऊ शकते...खरंच..तू शिकायला म्हणून घरच्यांना सोडून इथे आलीस...मग काही तडजोडी करायला लागतातच की...नंतर हे सगळं आठवशील आणि आईपासून सगळं लपवलं होतंस हे आठवून वाईट वाटण्याऐवजी हसायला येईल तुला..."
"हं.." रमाने मान डोलावली. 'माझीही तीच इच्छा आहे!' ती मनात म्हणाली.
"आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा मलाही थोडं टेंशन आलं होतं..मी माझ्या पप्पांना काहीच सांगितलं नव्हतं...मला मयूर म्हणाला की थोडं रेबेल असावं माणसाने..मनाला योग्य वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी मॉरली, रॅशनली बरोबर नसतात..पण सगळंच सरळमार्गी केलं तर आयुष्यात आठवायला नंतर काही राहणारच नाही...बिसाईडस...जगात कुणीच १००% रॅशनली वागत नाही! मग आपण कशाला प्रयत्न करायचा?" मनीषा सगळं आठवत म्हणाली मग स्वतःशीच हसली. रमाला तिचं कौतुक आणि हेवा दोन्ही वाटला. 
दर्शना आली आणि मनीषाने गाडी सुरु झाली.
"मला असे संडेज आवडतात...शॉपिंगगप्पा..उद्या पुन्हा रुटीन सुरु..." मनीषा 
"उद्या सोमवार नाही का...रमा,त्या अनिताचा विसा इंटरव्यू आहे उद्या..." दर्शना 
"फोन केलेला का तिने?" रमाने विचारलं.
"ती मेघाशी बोलली काल...खूपच प्रश्न पडले होते तिला..पहिल्या वेळी विसा रिजेक्ट झाल्याचं तिने खूप टेन्शन घेतलंय बहुतेक...मेघा तर गमतीत नंतर म्हणाली पण मला...की या मुलीच्या आवाजातल्या टेंशनमुळे तिचा विसा रिजेक्ट होईल या वेळी.." दर्शना हसत म्हणाली. 
रमाने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खिडकीतून बाहेर बघत विचार करायला लागली. 
सेमेस्टर संपायला महिना उरला होता.

 क्रमशः 

3 comments:

nik said...

very good. reading every part and eagerly waiting for the next one...

hrishikesh said...

same here... :)

Chaitanya Joshi said...

@Nik and Hrishikesh:
I really appreciate your comments and your interest :)
I have just posted the next part..just a couple more after that..
I want to stop on a good note. Keep visiting :)