Pages

Monday, December 17, 2012

जस्ट लाईक दॅट २० (अंतिम)

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७, भाग १८, भाग १९ 

                                                                                
सगळे सोपस्कार आटपले तेव्हा आदित्यने नवीन वेळ सेट केलेल्या घड्याळात पाहिलं. त्याला घ्यायला येणारी मुलं येऊन १५-२० मिनिटं तरी झाली असणारेत. तो त्यांनी सांगितलेल्या गेट नंबर बद्दल चौकशी करायला लागला. तिथल्या एका लेडी ऑफिसरने त्याला पुढे जात असलेल्या एका पाठमोऱ्या मुलीच्या मागे जायला सांगितलं. आदित्यने थोडं पुढे होत तिला हाक मारली.
"हाय..यु गोईन टू गेट १७?"
"येस"
"ओके..आय ऍम हेडिंग द सेम वे"
"ओके"
"माय नेम इझ आदित्य परचुरे..फ्रोम पुणे"
"मी रमा फडके..मुंबई"
"ओह..तू याच फ्लाईटला होतीस का?"
"येस"
"फनी...आपण इंडियाहून सेम फ्लाईटने आलो पण आपल्याला एकमेकांबद्दल माहित पण नाही..."
"हं"
"तुझी राहण्याची अरेंजमेंट कुणाकडे आहे?" 
"मेघा पालकर म्हणून एक मुलगी आहे..तुझी?"
"जीत ठाकूर..त्याला मेल केलीय मी एक-दोन वेळा..बहुतेक त्याच्याच घरी असेल"
"ओह ओके.."
'या मुलीला बोलण्यात फारसा रस नाही वाटतंआदित्यच्या मनात विचार येउन गेला. 
'अमेरिकेला येण्यापूर्वी या मुलाने एक-दोन मेल्स केल्या..कसला बेफिकीर माणूस आहे हापुण्याहून मुंबईला आलाय असं वाटतंय की काय त्याला?' रमाचं आदित्यबद्दलचं पहिलं इम्प्रेशन!

रमा आणि आदित्यला घ्यायला दोन वेगवेगळ्या गाड्या आल्या होत्या. सामान भरलं गेल्यावर गाडीत बसताना आदित्य रमाला म्हणाला- "सी यु अराउंड"
"या..शुअर"
                                       **
आदित्य त्याच्या खोलीतून बाहेर आला. रमा बाहेर त्याची वाट बघत बसली होती. तो तिच्याकडे बघून नर्व्हस हसला. 
"झालं बोलणं?" तिने विचारलं.
त्याने नकारार्थी मान डोलावली.
"का?"
"नाही सांगितलं मी"
"तेच विचारलं मी? तू सांगणार होतास ना?"
"रमा, एक खोटं, मग दुसरं खोटं, तिसरं खोटं असं खूप वेळा खोटं बोललं की एक वेळ अशी येते की पहिल्यापासून सगळं खरं सांगत बसण्यापेक्षा नवीन खोटं सांगणं सोप्पं जातं...प्रश्न कमी, गुंतागुंत कमी!" 
"म्हणजे तू नेमकं काय बोलला आहेस?" आलेला राग लपवत चेहरा शक्य तितका नॉर्मल ठेवत तिने विचारलं.
"तुझ्याबद्दल- आपल्या एकत्र राहण्याबद्दल काहीच नाही..पण यापुढे आपण एकत्र राहिलो तर मी नक्की खरं सांगणारे असं ठरवलंय!" आदित्य वाक्य बोलून गेला आणि त्याने रमाकडे पाहिलं. रमाने मुद्दाम वाक्य ऐकून न केल्यासारखं केलं होतं.
"तुझं आईशी बोलणं झालं पुन्हा?" आदित्यने विचारलं.
"नाही..तिला आधीच माझं अमेरिकेला जाणं पसंत पडलं नव्हतं आणि त्यात मी असं काहीतरी सांगितल्यावर खूप वाईट वाटलंय तिला..बोलली नाहीये ती माझ्याशी गेले दोन दिवस!! त्यात बाबा आणि श्रीला सगळं माहिती होतं हे कळल्यावर तिने बाबांशीसुद्धा वाद घातला. श्री 'होणारा जावई' असल्याने त्याला डायरेक्ट काही बोलली नाही एवढंच"
"आणि श्रीधरचा राग? तो तरी नीट बोलतोय का?"
"अजून नाही! पण आपण एकत्र राहत नाहीये हे कळलं की पुन्हा सगळं नीट होईल..पुन्हा प्रेम आणि पुन्हा हक्कं-कर्तव्यं!" 
"तुला वाटत नसलं तरी नॉर्मल जगात रिलेशनशिप्स अशाच असतात...आणि रिलेशनशिप्स रूल द वर्ल्ड..कटू सत्य"
गर्दीतून वेगळं उठून दिसणं रमाच्या बाबतीत कायम होत आलं होतं. भारतात असताना तिने गर्दीत 'फिट' होण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 'अमेरिकेत आल्यावर असं काही करावं लागणार नाही' असं तिला एअरपोर्टवर उतरल्या दिवशी वाटलं होतं. ते काही तिच्याबाबतीत झालं नाही पण निदान 'आपल्या बाबतीत असं का होतं?' याची कारणं मात्र तिला लक्षात यायला लागली होती. 
"आदि, आपण दोघांनी 'रिलेशनशिप' प्रकारावर कमेंट करणं चुकीचं आहे नाही का?" रमाने निर्विकारपणे विचारलं. आदित्य गप्प झाला.
तेवढ्यात बेल वाजली आणि बोलणं थांबलं.
"ये दर्शु"
"अगं ये नाही..चल..आय मीन दोघेही चला..." दर्शना मागून आलेल्या आदित्यला पाहत म्हणाली.
"कुठे?"
"अगं,सगळे राजच्या अपार्टमेंटमध्ये जमतोय...मनीषा निघतेय ना संध्याकाळी...तिला गिफ्ट द्यायचंय"
"ओह ओके ओके..हो पुढे आलेच मी.."
"तू तरी रेडी आहेस का?" दर्शुने आदित्यला विचारलं.
"अ..हो.."
"मग चल.."
"अ...ओके..." आदित्य दर्शनाबरोबर पुढे गेला. रमा नाराज होत आवरायला गेली.

"थॅंक्स गाय्स...मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मिस करणारे" मनीषा
"वि ऑल आर व्हेरी हॅप्पी फॉर यु" दर्शना 
"अमेरिकन लाईफचा मला न आवडणारा अजून एक पार्ट...आपण एकमेकांबरोबर राहतो...करिअरच्या या खूप महत्वाच्या स्टेजला एकमेकांना मदत करतो...पण आपल्याला एकमेकांच्या लग्नासारखी अति-महत्वाची इव्हेंट अटेंड करता येत नाही" मेघा 
"चालायचंच मेघा" जीत 
"नाही चालायचं जीत...तू नेहमी दिवाळी,गणपतीला म्हणतोस..की 'आपण ते सगळं पुन्हा कधीतरी भारतात साजरं करूच की'...लग्नाचं काय करशील?"
"परत करेल तो लग्न" राज म्हणाला आणि सगळे हसले.
"एकदा लग्न व्हायचा पत्ता नाही आणि तुम्ही परत करायचं म्हणताय" पुन्हा हशा "आणि मेघा..मनीषाच्या लग्नाला आपण नसणारे याचं तिला जेवढं वाईट वाटत नाहीये तेवढं तुला वाटतंय" जीत मेघाला डोळा मारत म्हणाला.
"अरे काय...मी बोलले की...तुम्हाला सगळ्यांना 'खूप' मिस करणारे म्हणून" मनीषा समजवायच्या सुरात म्हणाली.
"अगं, एवढं वाईट नको वाटून घेऊ..मी तयार आहे तुझ्या लग्नाला यायला..दोन कामं कर..माझ्या प्रोफेसरला सांग की राज पुढचे काही दिवस माझ्या लग्नासाठी माझ्याबरोबर इंडियाला येणारे..आणि दुसरं माझं तिकीट काढ...मी येतो लगेच" राज 
", मी याला मिस नाही करणारे..." मनीषा हसत म्हणाली. सगळे हसले. राजचं तोंड वाकडं झालं.
"फडके-परचुरे तुम्ही का गप्प? म्हणजे रमाचं ठीके..आम्हाला ती न बोलण्याची सवय आहे..पण आदित्यतू का गप्प? एखादा परचुरीझ्म होऊन जाऊ दे.." जीत 
"बोललो असतो रे...पण माझा इतक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही..माझ्या घरून कुणी मागे लागलेलं नाही..सो मला खरंच काही सुचणार नाही..." सगळ्यांनी मान डोलावल्या.
"नितीन कधी येतोय?" मेघाने विचारलं.
"उद्या दुपारी...कालच फोन झाला माझा..त्याला आणायला एअरपोर्टला जायचंय" जीत 
"ओह..आज आला असता तर मनीषाला भेटला तरी असता" 
"अगं, त्याने फोन केला मला...त्याला कालपर्यंत माहितीच नव्हतं...काल जीतकडून कळलं त्याला...मला म्हणे...लग्नाला उभी राहिलीस की एकदा मागे वळून बघ" मनीषा म्हणाली.
"ते कशाला?" दर्शना 
"माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत ना ते कन्फर्म कर म्हणे"
"काहीही..."
"आणि ती नवीन मुलगी कधी येतेय?" राज 
"ती धन्य आहे..तिने अजिबात काहीही कळवलं नाहीये...विसा झाल्यावर पण दोन आठवड्याने कळवलं विसा झाला म्हणून...आता अचानक कळवायची की मी येत नाहीये" दर्शना म्हणाली. आदित्य आणि रमाने त्या क्षणाला एकमेकांकडे पाहिलं. जीतच्या ते लक्षात आलं. जीतने त्यांना पाहिल्याचं आदित्यला कळलं-
"अवघड असतात नाही का लोक?" आदित्य भानावर येत म्हणाला.जीतने हसून मान डोलावली.
"हं..ते तर आहेच...पण ती यायला हवी..नाहीतर पुन्हा रमाचा गोंधळ होईल..गेल्या वेळी नेमका आदित्य होता..आता काय?" राज 
"आता खरंतर तुम्हाला सांगायला हरकत नाही..." मेघा दोघांकडे बघत म्हणाली- "आमची सगळ्यांची एक थियरी होती...की तुम्ही दोघे वेगळे राहायला तयार होणार नाही" 
"असं का वाटलं तुम्हाला?" रमाने तिच्या नेहमीच्या सुरात विचारलं.
"अगं,तुम्ही दोघं ज्या प्रकारे एकमेकांना नुसतं एक-दोनदा भेटून एकत्र राहायला सुरुवात केलीत...ते लक्षात घेता सहा महिने बरोबर राहिल्यावर वेगळे का राहाल?"
रमाने उत्तर दिलं नाही. ती चेहऱ्यावरून थोडी चिडलेली वाटत होती. तिच्याबद्दल असं काहीतरी तिच्या तोंडावर पहिल्यांदाच बोललं गेलं होतं. आदित्यसुद्धा गप्प बसून राहिला.
"रमा, तुला वाईट वाटलंय असं दिसतंय पण तू खरंच इतकं मनावर नको घेऊ...मी मागे आदित्यला जे बोललो होतो तेच आज पुन्हा बोलणारे...अमेरिकेला येताना प्रत्येकाच्या डोक्यात काही भन्नाट कल्पना असतात...आयुष्याला 'यु-टर्न' किंवा 'राईट' टर्न मिळेल आणि खूप बदल होतील...मोस्ट ऑफ द टाईम तसं होत नाही...अमेरिकन कल्चरमध्येसुद्धा आपण आपलं 'चौकटी' असणारं इंडो-अमेरिकन कल्चर वसवतो आणि त्यातच रमतो, सण-वार आले की हळहळतो, अमेरिकन लोकांच्या बिनधास्त-बेफिकीर वागण्याचा हेवा करतो...मला माहित नाही अजून काही वर्ष राहिल्यावर यात फरक पडतो का? पण सुरुवातीची काही वर्षं तरी ही परिस्थिती असते हे मी अनुभवाने सांगतोय..."
"जीतबुवा मुद्दा काये?" राजने हसत विचारलं."राज एक मिनिट...मी सिरिअसली काहीतरी सांगतोय...जे तुला, मला लागू होतं..हं, तर मग अशा परिस्थितीत तुमचं येणं, एका घरात राहण्याचा निर्णय घेणं आणि आता सहा महिन्यांनी तितक्याच निर्विकार, बेफिकीरपणे वेगळं होणं या सगळ्याबद्दल आम्हाला अभिमान, हेवा, असूया असं सगळंच वाटतंय..इतकं आयडियल खरंच काही असतं का? असा प्रश्नसुद्धा पडलाय!"      
जीतच्या बोलण्याने रमाला बरंच बरं वाटलं होतं.
"वेल, ह. भ. प. जीतबुवा ठाकूर यांनी जे काही सांगितलं ते समस्त मंडळाचं प्रातिनिधिक मत आहे असं परचुरे-फडके यांनी समजावं आणि चूक-भूल द्यावी घ्यावी..मनीषा बाईंच्या लग्नाच्या या मंगल प्रसंगी  सर्व हजर कार्यकर्त्यांच्या चहापानाची सोय करण्यात आलेली आहे..आम्ही मनीषा बाईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.." सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
"अरे चहापानाची सोय होणार होती ना?" राजने विचारलं.
"हो..तूच डिक्लेअर केलंस ते..मग कर की आता सोय" दर्शना म्हणाली.   
"मंडळात इतका महिला वर्ग असताना पुरुष मंडळी कष्ट घेत नाहीत..." राज म्हणाला.
"चला..दाखव मला चहा साखरेचे डबे..करते मी चहा..." 
दर्शना आणि राज किचनमध्ये गेल्यावर पुन्हा जीतने आदित्यकडे मोर्चा वळवला.
"पण आदित्य, खरंच इतकं आयडियल काही असतं का?"
"मला नाही माहित जीत...इट हॅपन्ड! जस्ट लाइक दॅट! हो की नाही गं रमा?"
रमाने मान डोलावली. मेघाने तिच्या बोलण्याबद्दल रमाला सॉरी म्हणून झालं. 
"आपणच त्या अनिताला आज रात्री फोन करून घेऊ..कारण तिला नाही तर आपल्यालाच गरज आहे..." मेघा म्हणाली. 
'ती जर का येणार नसेल तर मी रमाला एकटं टाकून वेगळं राहणार नाहीये' आदित्यच्या वाक्य तोंडावर आलं होतं. पण त्याने मोह आवरला.
"रमा, तुला इंडियातल्या फोटोंचा हेवा वाटतो ना? मग आज आपण इथल्या ख्रिसमस परेडचे फोटो काढायला जाउया..सण साजरे करावेत तर इथल्यासारखे...चांगले वेळ काढून सण साजरे करतात"
"जीत, जाऊ आपण परेडला...पण आता सवय झालीय मला..." रमा हसत म्हणाली. 
"तू संध्याकाळी मनिला सोडायला जातो आहेस ना?" मेघाने जीतला विचारलं.
"राज जाणारे..मी उद्या नितीनला आणायला जाणारे" 
"ए मला नक्की सांगा..माझा ऐन वेळी घोळ होईल..." 
"तुझ्याकडे बघून मला जुन्या हिंदी सिनेमातल्या हिरोच्या बहिणींची आठवण होतेय..." आदित्य म्हणाला.
"ए शी...काहीतरीच काय?"
"मग काय? त्यासुद्धा लग्नाला असल्या उतावळ्या असायच्या...सोडेल तुला राज..जाशील तू घरी....होईल तुझं लग्न"
"तू म्हणतोयस तर ठीके...पण काही बिघडलं ना तर तुझी जबाबदारी" मनीषा हसत म्हणाली.
संध्याकाळी राज मनीषाला एअरपोर्टला सोडून आला. रात्री मेघा-दर्शना-रमाने भेटून अनिताला फोन लावला. तिला यायला जेमतेम चार दिवस होते. तिने इंडियन स्टुडंट कमिटीला तिच्या येण्याबद्दल कळवलं होतं. रमाला आणि बाकी सगळ्यांना निरोप मिळाला नाहीये याचं तिला आश्चर्य वाटलं. मेघाने 'चार दिवसांनी भेटू मग बोलूच' असं सांगून फोन ठेवला.   

दुसऱ्या दिवशी सकाळी रमाने आदित्यला अनिताच्या येण्याबद्दल सांगितलं. नितीन पूर्वी तिथे राहिलेला असल्याने त्याला 'परतसेटल होण्यात विशेष त्रास होणार नव्हता.त्यात तो अनिताच्या आधी येणार होता. त्यामुळे नवीन अपार्टमेंट घेऊन त्याच्या युटीलिटी,इंटरनेट वगैरे फॉर्मलीटीस करणं सोप्पं होणार होतं. म्हणून नवीन अपार्टमेंट त्याने आणि आदित्यने रेंट करायची आणि रमाने अनिताबरोबर सेम अपार्टमेंट ठेवायची असं ठरलं.
"सो, तुझी नवीन रूम-मेट येतेय आणि माझा कधी न भेटलेला 'जुना' रूम-मेट येतोय"
"हं"
"रमा..मला पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे?"
"तोच म्हणजे?"
"सहा महिन्यांपूर्वी पडला होता तेव्हा एकत्र राहण्याबद्दल होता आता वेगळं राहण्याबद्दल आहे!"
"कोणता प्रश्न?"
"आपण करतोय ते बरोबर आहे ना?"
"आदि, माझंसुद्धा तेव्हाचं आणि आत्ताचं उत्तर तेच आहे...'आपण बोललोय याबद्दल..' प्लीज आता तू मला कन्फ्युस करतो आहेस" रमा थोडी चिडली.
"गम्मत करतोय गं"- तो हसत म्हणाला-"रमा, मला मजाच वाटतेय..आठवायला लागल्यापासून मी घरं बदलतोय! अमेरिकेला आल्यावर पण स्थैर्य नाही! आय जस्ट होप मला पुन्हा घर बदलायला लागणार नाही! किंवा लागलंच तर याच घरात परत यायला मिळेल.."
"हं" रमासुद्धा थोडी भावूक झाली होती. 

"तू एक काम कर...अनिता जेव्हा काही दिवस इंडियाला किंवा इथे कॉन्फरन्सला वगैरे जाईल तेव्हा तू मला राहायला बोलाव..आयडिया चांगली आहे ना?" आदित्यने भुवया उंचावत विचारलं.
"आदि, तू आता माझ्याबरोबर ऑफिशिअली फ्लर्ट करणारेस का?" रमाने विचारलं.
"वेल, माझ्या डोक्यात नव्हतं तसं..पण तू आता म्हणालीच आहेस तर-"
"परचुरे..बास..." ती हसत म्हणाली.
"ओके.." तो तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत राहिला. तिला जाणवल्यावर तीसुद्धा काही न बोलता उभी राहिली. बोलायला विषय नव्हता आणि ते दोघे असेच उभे राहिले असते तर कदाचित दोघांचा निर्णय बदलला असता. रमा आदित्यला काहीतरी खुण करून आत जायला वळली.
आदित्यने तिला पाठमोरी जाताना बघून, काहीतरी आठवून तिला हाक मारली. ती वळली. पण तिने वळताना नेहमीसारखे केस एका बाजूला घेतले नाहीत. 
'बहुतेक सगळंच बदललंय' आदित्य मनात म्हणाला.
"काय?" रमाने विचारलं.
"तुला काहीतरी द्यायचं होतं.." रमाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं. आदित्यने एक प्लास्टिकची पिशवी तिच्या हातात दिली.
"हे काय?" 
"तुझा पुढच्या महिन्यांत बर्थडे आहे ना..तेव्हा गिफ्ट द्यायला घेतली होती..बट आत्ताच देऊन टाकली" रमाने पिशवीतून टॉय स्टोरीच्या तिसऱ्या भागाची डीव्हीडी काढली. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं.
"मी बेट लावतो की तू रडणारेस" तो म्हणाला.
"काय?"
"थर्ड पार्ट बघून...आणि इतके दिवस तू काय मिस केलंस तेसुद्धा तुला कळेल..."
'मे बी मी यापुढे काय मिस करणारे ते मला आत्ता कळतंय' रमाच्या मनात आलं.
"नितीन दुपारी येतोय..त्याला आणायला मी जीतबरोबर थोड्या वेळात जातोय! मग माईककडे जाऊन आम्ही नवीन लीझ साईन करणारोत.." आदित्य डायनिंग टेबलवरचे पेपर्स गोळा करत म्हणाला. वेगळं राहायची वेळ एकदम जवळ आल्याचं रमाला जाणवलं.
"ओह...तू कधी शिफ्ट होणारेस?" तिने विचारलं. आदित्यने चमकून तिच्याकडे पाहिलं.
"तुला मला बाहेर काढायची एवढी घाई झालीय का?" त्याने निराशपणे विचारलं आणि खिडकीबाहेर बघायला लागला.
"नाही रे.." ती नर्व्हस होत म्हणाली. 
"आज जर का लीझ झालं, उद्या युटीलिटी कनेक्शन घेतलं की उद्या संध्याकाळीच शिफ्ट होईन मी.." त्याने तिच्याकडे पाहायला मान वळवली तर रमा त्याच्या शेजारी येऊन उभी होती. 
"तुला आठवतंय रमा, मी मागे म्हटलं होतं- आयुष्यातले बरेचसे प्रश्न ओब्जेक्टीव टाईप असतात...तुमच्याकडे उत्तर निवडायला बरोबर वाटणारे एकापेक्षा जास्त पर्याय असतात आणि त्यातला योग्य पर्याय निवडायचा..तोच पर्याय का निवडला याची स्पष्टीकरणं द्यायला लागली की गडबड होते...उत्तर बरोबर असेल तर कुणी स्पष्टीकरण वाचतही नाही पण चुकलं तर हमखास वाचतात"
"हं" 
"कधीकधी इच्छा होते जाणून बुजून चुकीचा पर्याय निवडायची..अशा वेळी काय करायचं असतं ते मात्र मला कळलेलं नाहीये" रमाने क्षणभर त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाजूला केला.
दोघे काही वेळ खिडकीबाहेर बघत उभे राहिले.  

त्या दिवशी दुपारी ठरल्याप्रमाणे नितीन आला. लीझ झालं. दुसऱ्या दिवशी नितीन आणि आदित्य युटीलिटीसाठी रजिस्टर करून आले. दुपारी आदित्यने एक बॅग नवीन अपार्टमेंटमध्ये नेउन ठेवली. दुसरी बॅग न्यायला तो आला तेव्हा रमाने त्याला अडवलं. 
"आदि, तू आजच्या आज का सामान शिफ्ट करतो आहेस? अनिताला यायला चार दिवस आहेत अजून..."
"नितीन आजपासून राहायचं म्हणतोय...त्याला एकट्याला रहा म्हणून मी इथे राहणं बरोबर दिसणार नाही" 
"आदि, तू म्हणालास ना की हिंदी सिनेमाचं बरं असतं..तिथे लोकांना एकमेकांबद्दल अचानक साक्षात्कार होतात..आणि मग हॅप्पी एंडिंग होऊन सिनेमा संपतो...खऱ्या आयुष्यात असं व्हायला पाहिजे होतं असं वाटायला लागलंय"
"रमा, हाच तर फरक असतो...सिनेमात आणि खऱ्या आयुष्यात! मनाला वाटणारी प्रत्येक गोष्ट बोलून दाखवता येत नाही, प्रत्येक रिलेशनला नाव देता येत नाही. काही नात्यांबद्दल, माणसांबद्दल, घटनांबद्दल खूप बोलून, त्यांना उलगडण्याचा प्रयत्न करत आपण त्यातली मजा घालवून टाकतो. मला आपल्या दोघांच्या बाबतीत तसं नाही होऊन द्यायचं. तसंही आपण एकमेकांपासून खूप लांबसुद्धा जात नाहीये..सो हे जे काही आपल्याला एकमेकांबद्दल वाटतंय ते निव्वळ एकत्र राहण्याने, २४ तासाच्या सहवासामुळे आहे की त्याहून जास्त काही आहे तेही येत्या काळात कळेलच...हॅप्पी एंडिंग न व्हायला आपली गोष्ट संपलीय कुठे?? इट विल गो ऑन..आपण बरोबर असू तोपर्यंत! आणि त्यानंतरसुद्धा..जस्ट लाइक दॅट"   
"आणि आपल्याला जे काही वाटतंय ते निव्वळ एकत्र राहण्यामुळे वाटत नव्हतं असं नंतर आपल्या लक्षात आलं तर आपण काय करायचं?" रमाने विचारलंच.
अमेरिकन एअरपोर्टला उतरल्यावर विसा ऑफिसरच्या 'तुमचा या देशात येण्याचा हेतू काय?' या पहिल्या प्रश्नाला आदित्यचं उत्तर होतं 'आय डोंट नो'. आज जवळपास सहा महिन्यांनी रमाने त्याला एक प्रश्न विचारला होता. त्याचं पुन्हा उत्तर तेच होतं-
"आय डोंट नो...एकीकडे असं वाटतंय आयुष्यातले हे गेले सहा महिने निघून जावेत..मला तुझ्याबद्दल काही वाटू नये...तुझं-श्रीधरचं माझ्यामुळे कधी भांडण होऊ नये..मी स्वतःला त्याच्या जागी ठेवून जेव्हा विचार करतो ना रमा, मला अमृता आठवते..मग माझा नैतिकता- भावनिकता असा गोंधळ सुरु होतो...आपण भेटलो यात श्रीधरची चूक काहीच नाही! पण तरी त्याच्या आणि पर्यायाने आपल्या 'इमोशनल बर्डन' मध्ये भर पडतेय.."
"आदि, मला इतका गुंतागुंतीचा विचार करता येत नाही..आपण भेटलो यात भले श्रीची चूक नसेल पण म्हणून त्याचं हक्क दाखवणं जस्टीफाय नाही करता येत..आणि प्रत्येक रिलेशनमध्ये असं असतं वगैरे मला खरंच नको सांगू या क्षणाला.." रमा चिडली.
"रमा,तू का चिडली आहेस? मी श्रीधरचा विचार करतोय आणि तू करत नाहीयेस म्हणून?"
"नाही...श्रीचा विचार तू त्याच्याबद्दल कळल्या दिवसापासून करतोयस हे माहितीय मला..पण म्हणून आपण एकत्र राहिलेले हे सहा महिने 'निघून जावेत' असं म्हणालास त्याचा जास्त राग आला मला..."
"रमा, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस..माझं कन्फ्युजन समजून घे...मी जे बोललो ते निव्वळ श्रीधरशी स्वतःला रिलेट करून! तुझ्याबरोबर मला एकत्र राहायला आवडेल हे मी तुला आधीच बोललोय.."
दोघे काही वेळ गप्प उभे राहिले.
"पुढचं रोटेशन कुणाकडे करतोयस?" रमाने शांततेचा भंग केला.
"रोटेशन टाळायचा प्रयत्न करतोय..मला मरेच्या ग्रुपमध्येच काम करायचं आहे. निदान तेवढं मला नक्की माहितीय..मग रोटेशन टाळता आलं तर बरं! मरेला मी रिपोर्ट सबमिट केला तेव्हा त्याने कळवलं की त्याला माझं काम आवडलंय..सो तो मला चांगला प्रोजेक्ट देईल..आणि लौकर पी.एचडीसुद्धा पूर्ण करू देतो म्हणे तो!"
"आदि, नक्की तू हे बोलतोयस?" ती त्याच्याकडे पाहत राहिली.
"हो..आय नो..मला स्वतःलापण खरं वाटत नाहीये...पण मला मागे कुणीतरी म्हणालं की मला एक पी.एच.डी स्टुडंट असल्यासारखं बिहेव्ह करता आलं पाहिजे..निर्णय घेता आले पाहिजेत.." तो हसत म्हणाला.
"खूप चिडले होते आदि मी तुझ्यावर त्या दिवशी...पण म्हणून का होईना तू निर्णय घ्यायला शिकलास.." ती हसत म्हणाली.
"सो..रमा फडके...तुझ्याबरोबर राहिलेले सगळे दिवस सुपर्ब होते...मी तुला खूप मिस करेन"
"मी सुद्धा" 
"मी काल एका कार्यक्रमात ऐकलं..एका फूड क्रिटिकला एका इंटरव्यूमध्ये विचारलं होतं- की आयुष्यात तुम्ही चाखलेल्या, खाल्लेल्या पदार्थांपैकी काय परत खायला आवडेल...त्यावर त्याने उत्तर दिलं- 'मला आत्तापर्यंत सर्वात जास्त आवडलेली रेसिपी पुन्हा 'पहिल्यांदा' खायला आवडेल'...रमा, खरंच आयुष्य सिनेमासारखं असेल तर मला रिवाइंड बटन दाबून गेले सहा महिने पुन्हा-पुन्हा 'पहिल्यांदा' जगायला आवडतील...नंतर काय होणारे याचा विचार न करता..."  
"आदि, हा गेल्या सहा महिन्यातला बेस्ट 'परचुरीझ्म' होता.." रमा म्हणाली. 
"परचुरीझ्म? काय रमा? तूसुद्धा?" आदित्यने हसत मान डोलावली. तिने हसत कान धरले. 
"येऊ का?" त्याने बॅग उचलत विचारलं. रमाने एक मोठा श्वास भरून घेतला आणि मान डोलावली.
आदित्य बाहेर पडला.
'हॅप्पी एंडिंग न व्हायला आपली गोष्ट संपलीय कुठे?? इट विल गो ऑन..आपण बरोबर असू तोपर्यंत! आणि त्यानंतरसुद्धा..जस्ट लाइक दॅट' रमा त्याचं वाक्य मनात घोळवत राहिली.

समाप्त 

Sunday, December 9, 2012

जस्ट लाईक दॅट १९


आत्तापर्यंत:


"रमा, तुमच्या पुढच्या सेमला कोण ती मुलगी येणारे तिचा विसा झाला का?" श्रीने फोनवर विचारलं.
"हो झाला" रमाला हे संभाषण कुठे जाणारे याचा अंदाज आला.
"मग ती कधी येणारे?" 
"अजून १५ दिवस आहेत तिला यायला"
"ओह..ती आली की तुझ्याबरोबर राहील..मग आदित्यचं काय?"
"श्री, तुला आदित्यची किती काळजी आहे ते मला माहितीय..त्याच्याबरोबर पुढच्या सेममध्ये राहायला एक मुलगा येणारे हे मी तुला कधीच सांगितलं आहे! गेल्या सेमला तो इंटर्नशिपहून परत आला नाही म्हणूनच आम्ही एकत्र राहायला लागलो हेही मी तुला बोलले होते" रमा रागात म्हणाली. श्रीने तिच्या आवाजातला फरक ओळखला. 
"रमा, तुझ्या आवाजावरून तू चिडली आहेस हे समजतंय! पण मी तुला डिवचायला चौकशी करत नाहीये. मी तुझ्या काळजीने तुझी आणि कर्टसी म्हणून आदित्यची चौकशी केली"
"बरं"
"मी खरंच तुझं आदित्यबरोबर राहणं मान्य केलं आहे. निदान एवढं क्रेडीटतरी मला देना..दुसऱ्या कुठल्या मुलाने असं केलं नसतं! आता पुढच्या सेमपासून तुझ्याबरोबर राहायला येणाऱ्या मुलीची मी चौकशी केली तर मी लगेच वाईट होतो का?"
"मी तुझं सारखं कौतुक करत राहणं अपेक्षित आहे का?"
"रमा, कौतुकाचा प्रश्न नाही. मला तुझ्या बोलण्यातून असं जाणवतंय की आदित्य यापुढे तुझ्याबरोबर राहणार नाहीये याचं तुला वाईट वाटतंय.."
"१०००० मैलांवर बसून इथे घडणाऱ्या गोष्टींवर प्रेडिक्शनस करतोयस का तू?" रमाने विचारलं.
"प्रेडिक्शनस नाहीत या इंटयूशन्स आहेत..मी गेल्या दोन-अडीच महिन्यांत स्वतःला हा प्रश्न शंभर वेळा विचारलाय..पण आता तुलाच विचारून टाकतो...तुझं माझ्यावर प्रेम आहे का?"
"अ...माहित नाही"   
"आदित्यवर?" उत्तर अपेक्षित असल्याच्या स्वरात श्रीने लगेच पुढचा प्रश्न विचारला.
"नाही" रमाने ठाम नकार दिला. श्री गप्प झाला.
"श्री, हे असले बालिश खेळ माझ्याशी खेळू नकोस..तू काय करण्याचा प्रयत्न केलास याचा पुन्हा विचार कर फॉर द रेकॉर्ड...माझं आदित्यवर प्रेम वगैरे नाहीये, तुझ्यावर आहे का हे या डिस्कशननंतर मला खरंच माहित नाही! आणि हो, आदित्यबरोबर यापुढे राहता येणार नाही याचं मला वाईट वाटतंय! मी कदाचित स्वतःहून स्वतःकडेच कबूल केलं नसतं पण तूच करायला लावलंस"
"रमा, मला कधीच वाटलं नव्हतं की मला तुला हे वाक्य बोलावं लागेल..पण 'तू चुकीचं वागते आहेस!' तुझ्या आईशी तू खोटं बोलतेयस! आपलं लग्न ठरायच्या मार्गावर असताना मलाच 'दुसऱ्या एका मुलाबरोबर तुला राहायला मिळणार नाहीये याचं वाईट वाटतंय' हे बेधडक सांगते आहेस"
"एक मिनिट श्री- तू सगळं बरोबर बोलतोयस कदाचित पण मला तुला अडवायला लागणारे...कारण पुन्हा एकदा तू विसरला आहेस की मी इथे शिकायला आलीय आणि दोन दिवसात माझी परीक्षा आहे" तिने फोन ठेवला. श्रीने केलेला आरोप शंभर टक्के चुकीचा नव्हता. तिने आईपासून सगळं लपवलं होतंच! पण आईला खरं सांगितलं असतं तर काय झालं असतं याची तिला कल्पनासुद्धा करवत नव्हती.

"तुला खूपच उशीर झाला आज..फोन पण उचलत नव्हतास?" रमाने आदित्यला विचारलं.
"हो, फायनली सगळा डेटा मिळाला..कम्पाइल करून रिपोर्ट दिला की काम झालं..मी साराशी बोलत होतो तू फोन केलास तेव्हा"
"ओके..जेवण झालंय..लगेच जेवायचं आहे की?" तिने विचारलं.
"चहा-" आदित्य तिच्याकडे बघत पुटपुटला. तिने न ऐकल्यासारखं केलं. ते बघून स्वतःच म्हणाला- "ओके...जेवून घेऊ...मी आवरून येतो दहा मिनिटात" 
तो आवरून बाहेर आला तेव्हा रमा पानं वाढत होती.
"झालं एकदाचं काम...आता दोन दिवस एक्झाम्स की संपली एकदाची सेम..."
"हं...छान.."
"तुझा अभ्यास झाला असेल ना?"
"चालू आहे...मेघा आलेली दुपारनंतर...मग गप्पाच जास्त झाल्या"
"गुड..मीसुद्धा साराशी खूप गप्पा मारत बसलो..म्हणून जास्त उशीर झाला"
"हं"
"तिला मी गप्पांच्या ओघात तुझ्याबद्दल सांगितलं-" रमाने चमकून हातातला चमचा तसाच हवेत ठेवून त्याच्याकडे पाहिलं.
"-अगं,एवढं भांबावण्यासारखं काही नाही. ती मला कुठे राहतोस,कुणाबरोबर राहतोस वगैरे विचारत होती. मी तिला म्हटलं की मी एका मुलीबरोबर राहतो तेव्हा मग कोण मुलगी?काय करते? वगैरे प्रश्न पडले तिला..तिला बरंच कौतुक वाटलं की आपण अनोळखी देशात येऊन एकमेकांबरोबर राहायला लागलो वगैरे"
"हं" विषयावर चर्चा वाढू नये म्हणून रमाने मुद्दामच जेवणात गर्क असल्याचं आदित्यला भासवलं.
"ती मला म्हणालीसुद्धा की हे असं आमच्या देशातसुद्धा खूप कॉमनली होत नाही..तुम्ही खूप भारी काहीतरी करताय"
"हं" रमा काही जास्त बोलत नाहीये हे एव्हाना आदित्यच्या लक्षात आलं होतं पण या क्षणाला दुसरा विषय त्याला सुचत नव्हता.
"सध्या ती एका लिबरल आर्टस डिपार्टमेंटच्या एका मुलाला डेट करतेय...तिच्या घरच्यांना तो फारसा आवडत नाहीये..तिला त्यांच्या काळजीचं कौतुक आहे. 'ती म्हणाली की अजून वीस-पंचवीस वर्षांनी माझी मुलगी कुणाला डेट करतेय याकडे मला लक्ष द्यावंच लागेल'. मला सहज जाणवलं की जगात कुठेही गेलं तरी मुलीबद्दल तिच्या आई-वडलांना वाटणारी काळजी कुठे कमी-जास्त होत नाही" आदित्य थोडं गमतीत म्हणाला पण रमाचा चेहरा पाहून त्याला त्याच्या बोलण्याचं गांभीर्य लक्षात आलं.
"रमा, सॉरी..तुला हर्ट होईल असं काहीतरी मला बोलायचं नव्हतं...पण काही इमोशन्स सोशिओ-सायकॉलॉजीने बदलत नाहीत हे लक्षात आल्यावर मला हे बोलल्याशिवाय राहावलं नाही...स्पेशियली तुझ्याशी" आदित्य  म्हणाला. 'सोशिओ-सायकॉलॉजी' असा जड शब्द ऐकून रमाला त्याही परिस्थितीत हसू आलं. 
"आदि, तू हल्ली मराठीऐवजी कठीण कठीण इंग्लिश शब्द वापरायला लागला आहेस. 'केओटिक सेल्फ' आणि आता हे 'सोशिओ-सायकॉलॉजी'..अमेरिकेला आल्याचा हा इफेक्ट का?" रमाने विचारलं.
"हा इफेक्ट म्हणजेच सोशियल सायकॉलॉजी गं...आपण एकत्र राहतो या गोष्टीचं साराला एक अमेरिकन म्हणून कौतुक वाटलं. तेच आपल्याकडच्या सगळ्यांनी काहीतरी चुकीचं घडतंय असं बिहेव्ह केलं..पण मुलीचा बॉयफ्रेंड,मित्र, रूममेट हा विषय इथेही लोकांसाठी अजूनही तेवढाच नाजूक आहे..अमेरिकन असो, इंडियन असो किंवा अजून कुणी असो, मुलीची काळजी सगळ्यांना तेवढीच" 
रमा पुन्हा थोडी भावूक झाली.
"रमा,आपण गेले काही महिने एकत्र राहतोय..मी तुला कधीच बोललो नाही पण मला तुला इतकंच सांगायचं आहे की तू तुझ्या आईशी खरं बोलली नाहीयेस याची मला जाणीव आहे आणि ही लपवाछपवी तूसुद्धा निव्वळ 'आदर' म्हणून केलेली आहेस याचीही मला कल्पना आहे" रमा त्याच्याकडे पाहते आहे याची खात्री झाल्यावर आदित्य म्हणाला. तिने डोळे मिटून मान डोलवली. शांततेत जेवणं झाली. जेवून उठताना रमा आदित्यला म्हणाली.
"आदि, मी ठरवलंय..एकदा सेम संपली ना की आईला सगळं खरं खरं सांगायचं..आपण बरोबर राहत असलो-नसलो तरी"
तिच्या वाक्यातल्या 'नसलो' शब्दाने त्याला मनापासून वाईट वाटलं होतं. दुसरा काहीच पर्याय नसेल तर घरी असं काहीतरी सांगायचं अशी त्याची जनरल फिलोसॉफी होती. त्यामुळे साहजिकच त्याच लॉजिकने 'रमाबरोबर यापुढे आपण राहणार नाहीये' असा त्याने अंदाज बांधला.  

निव्वळ तडजोड म्हणून एका अनाहूत क्षणी एकत्र राहायचा निर्णय आदित्य आणि रमाने घेतला. आपले हेतू स्पष्ट आणि स्वच्छ आहेत हे स्वतःला, समोरच्या व्यक्तीला आणि आजूबाजूच्या प्रत्येकाला पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न दोघांनी वेळोवेळी केला होता.पण पाचेक महिन्यांच्या काळात दोघांना नुसती एकमेकांची सवयच झाली नव्हती तर दोघे एकमेकांत गुंतले होते. 'आपण निव्वळ रूममेट्स म्हणून एकत्र राहणारोत तेव्हा सहवासाने एकमेकांबद्दल जाणून घेणं हे मला लग्न झालेल्या जोडप्यासारखं वाटतं' असं आदित्य गमतीत एकदा म्हणालासुद्धा होता. पण अपेक्षित-अनपेक्षित वळणं घेत दोघांचं नातं निर्णय घेण्याच्या स्टेजला आलं होतं. अनिताचा विसा झाला होता आणि नितीनला यायला चारेक दिवस उरले होते.  

परीक्षा झाल्यावर आदित्य घरी आला तेव्हा रमा आली नव्हती. तिला लॅबमध्ये वेळ लागणार असल्याचं तिने त्याला सकाळीच सांगितलं होतं. तिच्याशी काय आणि कसं बोलायचं याचा निर्णय आदित्यला घेता येत नव्हता. आपण रमाबरोबर गेले पाच साडेपाच महिने खूप विशेष कुरबुरी न होता, तिला आपल्यामुळे कुठला त्रास न देता राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याची त्याने स्वतःशीच पुन्हा एकदा खात्री केली. त्याला यापुढेही असंच राहायचं होतं. अजून आठवडाभराने सगळं बदललेलं असेल याचा पुरेपूर अंदाज असूनसुद्धा रमाशी जेव्हा हा विषय डिस्कस होईल तेव्हा 'मला तुझ्याबरोबरच राहायला आवडेल' हे निदान तिच्या कानावर घालायचं आदित्यने नक्की केलं. रमा घरी आली तेव्हा आदित्य बाहेरच सोफ्यावर लवंडला होता. 
"आदि, आत जाऊन झोपतोस का?" तिने त्याला हाक मारली. तो दचकून जागा झाला. 
"तू कधी आलीस?किती वाजले?" त्याने झोपेत विचारलं.
"मी जस्ट आले..सहा वाजलेत"
"ओह ओके..म्हणजे मी जास्त वेळ झोपलो नाहीये.."
"झोपलास तरी काही हरकत नाहीये..काहीच काम नाहीये..थोडा वेळ झोपणार असलास तर झोप.."
"नाही..झोप नाही येते मला...तू आत्ता बिझी असणारेस का?"
"का?"
"बाहेर गेलो असतो.."
"आदि, आपण घरात जेवूया..बाहेर जायची गरज नाहीये..मी जेवण करेन हवं तर"
"जेवायला नाही गं! असंच. कॉफी प्यायला.रूम-मेट्स टाईम! जेवण आल्यावर करेन मी.."
"लगेच जायचंय?"
"हो..तू रेडी आहेसच! तुला अजून एक्सट्रा स्वेटर वगैरे घ्यायचा असला तर घे! थंडी बऱ्यापैकी वाढलीय गेल्या तीन-चार दिवसात. मी तोंडावर पाणी मारून येतो" तिने मान डोलावली.
आदित्य फ्रेश होऊन आला आणि दोघे घरातून बाहेर पडले.
"आपण नुसते चालणार आहोत की काही बोलणार आहोत?" रमाने विचारलं. आदित्यने खिन्न हसून तिच्याकडे पाहिलं.
"नाही म्हणजे एकदा तूच म्हणाला होता की साधारणपणे मित्र-मैत्रिणी असे फिरायला बाहेर पडले की शिळोप्याच्या गप्पा मारतात आणि तुझ्याकडे गप्पा मारायला विषय नाही हेही होऊ शकत नाही"
"विषय आहे बोलायला..पण जरा शांत बसू आणि बोलू.." आदित्यने उत्तर दिलं. रमा गप्प झाली. आदित्य काय बोलणारे याची तिलाही कल्पना आली. आपण त्याच्याशी काय बोलायचं आहे याची तिनेही मनात उजळणी सुरु केली. 
बाहेर कधीच अंधार पडला होता. जेवायला, फिरायला बाहेर पडलेले तुरळक विद्यार्थी सोडून फारशी वर्दळ नव्हती. एका स्ट्रीट लाईटच्या खाली दिसलेल्या रिकाम्या बाकावर दोघे जाऊन बसले. 
"नितीनचा फोन येऊन गेला मला. तो येतोय परवा" आदित्य म्हणाला.
"ओह ओके.." तिने तुटक उत्तर दिलं.
"अनितापण अजून दोनेक आठवड्यात येईलच.." त्याने तिच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करत पुन्हा वाक्य टाकलं.
"हं" 
"मग आपण दुसरं अपार्टमेंट बघायला सुरुवात करायची ना?" आदित्यने निर्वाणीचा प्रश्न विचारला. तिने त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही. आदित्य उत्तराची वाट बघत तिच्याकडे पाहत राहिला. दोनेक मिनिटं गेली. तिने त्याच्याकडे पाहत मान डोलवली.
"रमा, फॉर व्हॉट इटस वर्थ..मला इतकंच सांगायचं आहे की माझे गेले पाच-साडेपाच महिने खूप चांगले गेले. जर शक्य असतं मला यापुढेही तुझ्याबरोबरच राहायला आवडलं असतं" आदित्य एक एक शब्द शांतपणे बोलला. 
रमाने त्याच्याकडे पाहिलं. ती काय प्रतिक्रिया देणारे याची त्याला काहीच कल्पना येत नव्हती. 
"आदि, खरंतर मलासुद्धा हेच म्हणायचं होतं" ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"ओह" दोघांनी एकमेकांची नजर चुकवली. प्रश्न तसाच होता- पुढे काय?
आपण जिच्यात इनव्होल्व्ह झालो ती व्यक्तीसुद्धा आपल्यात गुंतलीय हे कळण्यासारखं सर्वोत्कृष्ट फिलिंग जगात कुठलं नाही. 'मला तिच्याबरोबर रहायचंय आणि तिला माझ्या बरोबर!' इथेच 'हॅप्पी एंड' झाला असता तर किती बरं झालं असतं असा विचार आदित्यच्या मनात येऊन गेला. पण इतकं सोप्पं नव्हतं. आता प्रश्न वाढत होते.  

"मग आता?" आदित्यचा कन्फ्युस प्रश्न!
"मला नाही माहित" रमाने ती निरुत्तर झाल्याचं कबूल केलं.
"रमा, मला माहितीय की तू चिडणारेस या प्रश्नावर. पण आपण बरोबर करतोय काय गं? मोर ओव्हर, आपण पहिल्यापासून कधीतरी बरोबर वागलो का?"
"तुला असा प्रश्न का पडला?" 
"आपण दोघांनी एका रिलेशनशिप किंवा जे काही आहे, होतं ते असताना एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आज आपल्याला एकमेकांबरोबर राहायचं आहे. घरच्यांशी आपण खोटं बोलतोय. आणि सगळ्यात महत्वाचं- मी खूप प्रामाणिकपणे कबूल करतो की 'मला तुझ्याबरोबर राहायला आवडेल' इथेच स्टेटमेंट संपतंय माझं. ते सोडून या क्षणाला तुझ्याबद्दल मला काय वाटतंय ते मला सांगता पण येणार नाही"
"आदि, आपलं हेच चुकलं बहुतेक. पहिल्यापासूनच! आपण घरच्यांना काही सांगितलं नाहीच, पण एकमेकांनासुद्धा कधीच काहीच ओपनली सांगितलं नाही. त्यामुळे आपल्याला एकमेकांबद्दल नाविन्य,गूढ वाटत राहिलं हे खरं, पण आता वेगळं राहण्याची वेळ आली तर अशी गुंतागुंत झालीय" रमा त्याच्याकडे बघत म्हणाली. 
"अ...आपण सुशिक्षित, समंजस असणं अपेक्षित आहे नाही का?" त्याने चेहऱ्यावर उसनं हसू आणून ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा काही वेळ शांतता! 
"तुला माझ्याबरोबर का राहायचं आहे?" त्याने पुन्हा शांतता भंग केली. तिने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. त्याने जीभ चावली. रमा बोलायला लागली.
"आदि, तू गैरसमज करून घेणार नाहीस याची खात्री आहे मला म्हणून सांगते. श्री गेली काही वर्ष माझ्याबरोबर आहे. त्याला माझ्याबद्दल आपुलकी आहे,प्रेम आहे आणि तेवढाच तो माझ्यावर हक्कसुद्धा गाजवतो. इथे येण्यापूर्वी मी त्याला मी एवढ्यात त्याच्याशी लग्न करू करणार नाही असं सांगून आले कारण मला त्याच्या प्रेमापेक्षा त्याच्या हक्क गाजवण्याचं जास्त टेन्शन आलं. तो खूप कमिटेड आहे पण तो ती कमिटमेंट बोलूनसुद्धा दाखवतो. मला माहितीय की बऱ्याच मुलींना माझ्याबरोबर इतका आयडियल,कमिटेड मुलगा असल्याचा हेवा वाटेल. याला माझा मूर्खपणा म्हण,स्टबर्नपणा म्हण पण मला नेमकं हेच नकोय. गेल्या पाचेक महिन्यांचं म्हणालास तर- आय हॅव्ह बीन मी..जस्ट मी..जस्ट लाईक दॅट. तुझ्याबरोबर मला का राहायचं आहे विचारलंस तर आत्ता मला हेच कारण सुचतंय! आणि माझंही स्टेटमेंट इथेच संपतंय. मला हे असलं जड बोलणं जमत नाही,आवडत नाही. पण कदाचित आपण परत हा विषय कधीच बोललो नाही तर सांगायचं राहून गेलं असं मला वाटायला नकोय!"
आदित्य तिच्याकडे एकटक पाहत होता. ती बोलायची थांबली आणि त्याने खांदे उडवत नजर वळवली. 
'ऑकम, मला आदिबरोबर राहायचं आहे. त्यालासुद्धा माझ्याबरोबर राहायचं आहे. समस्या थोडी गुंतागुंतीची आहे. आहे का काही सोप्पं उत्तर?' रमाच्या मनात विचार आला. 

"आपलं अपार्टमेंट कुणी ठेवायचंय?" रमाने निर्विकार आवाजात विचारलं. आदित्य मान खाली घालून बसून राहिला. त्याचे प्रश्न संपले नव्हते.
"रमा, मग आपण जे वाटतंय ते सगळं विसरून जायचं आणि वेगळं राहायला लागायचं?" त्याने जवळ पडलेला एक तुरळक दगड बुटाने उडवत प्रश्न विचारला.
"मग आपण काय करू शकतो? आपण एकत्रच राहू अशी कुणाला शंका जरी आली तरी बाबा, श्री, बाकीचे लोक त्यातून भलते-सलते अर्थ काढतील आणि त्यात आपलं काय चाललंय हे या मुमेंटला आपल्यालाच नीट माहीत नाहीये"
"रमा, हिंदी सिनेमांमध्ये बरं असतं ना? हिरो-हिरोइन्सना एकमेकांबद्दल अचानक साक्षात्कार होतात मग त्यांच्या आयुष्याला आणि पर्यायाने सिनेमाला भलतीच कलाटणी मिळते. पण तुझ्या-माझ्या साध्या, खऱ्या, 'बोरिंग' आयुष्यात तसं नाहीच होत बहुतेक! कारण खऱ्या आयुष्यातले प्रश्न, परिस्थिती या गोष्टी सिनेमांपेक्षा जास्त कॉम्पलिकेटेड असतात. आपले कुठलेच विचार, दृष्टीकोण, नातेसंबंध कधीच एका क्षणाच्या मोठ्या साक्षात्कारानंतर बनत नाहीत आणि नष्ट होत नाहीत.नैतिकता, विश्वासार्हता सारख्या बेसिक महत्वाच्या गोष्टी आपले संस्कार विसरू शकत नाहीत आणि म्हणून एखादा निर्णय भावनिकपणे  घ्यायचा की व्यावहारिकपणे हे ठरवताना आपण जास्त कन्फ्युस असतो" 
"आदि, मी आईला फोन करणारे आज! आणि तिला सगळं खरं-खरं सांगणारे..निदान मला ते ओझंतरी माझ्या डोक्यावरून काढून टाकायचं आहे"
"पण जर का यापुढे आपण बरोबर राहणार नसू तर मग आईला सांगणं कशासाठी?" 
"तिला श्रीकडून, बाबांकडून कळलं तर तिचा माझ्यावर विश्वास नाही राहणार..मला ते नाही होऊन द्यायचं"
"रमा, मी पण घरी सांगून टाकतो सगळं..." आदित्य पटकन म्हणाला. रमाने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं.
"हो, तुला आईशी बोलायचं आहे कारण तुला मानसिक शांतता हवीय, मला घरच्यांशी बोलायचंय कारण मला सोल्युशन हवंय"
"सोल्युशन?"
"हो, माझे निर्णय आत्तापर्यंत घरचेच घेत होते नाही का? मग माझ्या या मानसिक गोंधळावर त्यांच्याकडे काहीतरी उत्तर असेल या आशेने त्यांच्याशी बोलायला हरकत नाही"
"आर यु श्युअर?"
"नॉट रिअली.." तो नर्व्हस हसत म्हणाला. रमाला हसायला आलं.
"निघायचं?" रमाने विचारलं. दोघांना उठायची इच्छा नव्हती पण बेटर पर्याय नव्हता. बसून चर्चा करण्यात तात्विक, वैचारिक गोंधळ वाढत होते. दोघे उठून चालायला लागले.

सेमेस्टर संपलं होतं. 'काहीतरी अनपेक्षित घडून आपल्याला एकत्र राहायला मिळालं तर?' हाच विचार या क्षणाला दोघांच्याही मनात येत होता.

क्रमशः