Pages

Sunday, December 9, 2012

जस्ट लाईक दॅट १९


आत्तापर्यंत:


"रमा, तुमच्या पुढच्या सेमला कोण ती मुलगी येणारे तिचा विसा झाला का?" श्रीने फोनवर विचारलं.
"हो झाला" रमाला हे संभाषण कुठे जाणारे याचा अंदाज आला.
"मग ती कधी येणारे?" 
"अजून १५ दिवस आहेत तिला यायला"
"ओह..ती आली की तुझ्याबरोबर राहील..मग आदित्यचं काय?"
"श्री, तुला आदित्यची किती काळजी आहे ते मला माहितीय..त्याच्याबरोबर पुढच्या सेममध्ये राहायला एक मुलगा येणारे हे मी तुला कधीच सांगितलं आहे! गेल्या सेमला तो इंटर्नशिपहून परत आला नाही म्हणूनच आम्ही एकत्र राहायला लागलो हेही मी तुला बोलले होते" रमा रागात म्हणाली. श्रीने तिच्या आवाजातला फरक ओळखला. 
"रमा, तुझ्या आवाजावरून तू चिडली आहेस हे समजतंय! पण मी तुला डिवचायला चौकशी करत नाहीये. मी तुझ्या काळजीने तुझी आणि कर्टसी म्हणून आदित्यची चौकशी केली"
"बरं"
"मी खरंच तुझं आदित्यबरोबर राहणं मान्य केलं आहे. निदान एवढं क्रेडीटतरी मला देना..दुसऱ्या कुठल्या मुलाने असं केलं नसतं! आता पुढच्या सेमपासून तुझ्याबरोबर राहायला येणाऱ्या मुलीची मी चौकशी केली तर मी लगेच वाईट होतो का?"
"मी तुझं सारखं कौतुक करत राहणं अपेक्षित आहे का?"
"रमा, कौतुकाचा प्रश्न नाही. मला तुझ्या बोलण्यातून असं जाणवतंय की आदित्य यापुढे तुझ्याबरोबर राहणार नाहीये याचं तुला वाईट वाटतंय.."
"१०००० मैलांवर बसून इथे घडणाऱ्या गोष्टींवर प्रेडिक्शनस करतोयस का तू?" रमाने विचारलं.
"प्रेडिक्शनस नाहीत या इंटयूशन्स आहेत..मी गेल्या दोन-अडीच महिन्यांत स्वतःला हा प्रश्न शंभर वेळा विचारलाय..पण आता तुलाच विचारून टाकतो...तुझं माझ्यावर प्रेम आहे का?"
"अ...माहित नाही"   
"आदित्यवर?" उत्तर अपेक्षित असल्याच्या स्वरात श्रीने लगेच पुढचा प्रश्न विचारला.
"नाही" रमाने ठाम नकार दिला. श्री गप्प झाला.
"श्री, हे असले बालिश खेळ माझ्याशी खेळू नकोस..तू काय करण्याचा प्रयत्न केलास याचा पुन्हा विचार कर फॉर द रेकॉर्ड...माझं आदित्यवर प्रेम वगैरे नाहीये, तुझ्यावर आहे का हे या डिस्कशननंतर मला खरंच माहित नाही! आणि हो, आदित्यबरोबर यापुढे राहता येणार नाही याचं मला वाईट वाटतंय! मी कदाचित स्वतःहून स्वतःकडेच कबूल केलं नसतं पण तूच करायला लावलंस"
"रमा, मला कधीच वाटलं नव्हतं की मला तुला हे वाक्य बोलावं लागेल..पण 'तू चुकीचं वागते आहेस!' तुझ्या आईशी तू खोटं बोलतेयस! आपलं लग्न ठरायच्या मार्गावर असताना मलाच 'दुसऱ्या एका मुलाबरोबर तुला राहायला मिळणार नाहीये याचं वाईट वाटतंय' हे बेधडक सांगते आहेस"
"एक मिनिट श्री- तू सगळं बरोबर बोलतोयस कदाचित पण मला तुला अडवायला लागणारे...कारण पुन्हा एकदा तू विसरला आहेस की मी इथे शिकायला आलीय आणि दोन दिवसात माझी परीक्षा आहे" तिने फोन ठेवला. श्रीने केलेला आरोप शंभर टक्के चुकीचा नव्हता. तिने आईपासून सगळं लपवलं होतंच! पण आईला खरं सांगितलं असतं तर काय झालं असतं याची तिला कल्पनासुद्धा करवत नव्हती.

"तुला खूपच उशीर झाला आज..फोन पण उचलत नव्हतास?" रमाने आदित्यला विचारलं.
"हो, फायनली सगळा डेटा मिळाला..कम्पाइल करून रिपोर्ट दिला की काम झालं..मी साराशी बोलत होतो तू फोन केलास तेव्हा"
"ओके..जेवण झालंय..लगेच जेवायचं आहे की?" तिने विचारलं.
"चहा-" आदित्य तिच्याकडे बघत पुटपुटला. तिने न ऐकल्यासारखं केलं. ते बघून स्वतःच म्हणाला- "ओके...जेवून घेऊ...मी आवरून येतो दहा मिनिटात" 
तो आवरून बाहेर आला तेव्हा रमा पानं वाढत होती.
"झालं एकदाचं काम...आता दोन दिवस एक्झाम्स की संपली एकदाची सेम..."
"हं...छान.."
"तुझा अभ्यास झाला असेल ना?"
"चालू आहे...मेघा आलेली दुपारनंतर...मग गप्पाच जास्त झाल्या"
"गुड..मीसुद्धा साराशी खूप गप्पा मारत बसलो..म्हणून जास्त उशीर झाला"
"हं"
"तिला मी गप्पांच्या ओघात तुझ्याबद्दल सांगितलं-" रमाने चमकून हातातला चमचा तसाच हवेत ठेवून त्याच्याकडे पाहिलं.
"-अगं,एवढं भांबावण्यासारखं काही नाही. ती मला कुठे राहतोस,कुणाबरोबर राहतोस वगैरे विचारत होती. मी तिला म्हटलं की मी एका मुलीबरोबर राहतो तेव्हा मग कोण मुलगी?काय करते? वगैरे प्रश्न पडले तिला..तिला बरंच कौतुक वाटलं की आपण अनोळखी देशात येऊन एकमेकांबरोबर राहायला लागलो वगैरे"
"हं" विषयावर चर्चा वाढू नये म्हणून रमाने मुद्दामच जेवणात गर्क असल्याचं आदित्यला भासवलं.
"ती मला म्हणालीसुद्धा की हे असं आमच्या देशातसुद्धा खूप कॉमनली होत नाही..तुम्ही खूप भारी काहीतरी करताय"
"हं" रमा काही जास्त बोलत नाहीये हे एव्हाना आदित्यच्या लक्षात आलं होतं पण या क्षणाला दुसरा विषय त्याला सुचत नव्हता.
"सध्या ती एका लिबरल आर्टस डिपार्टमेंटच्या एका मुलाला डेट करतेय...तिच्या घरच्यांना तो फारसा आवडत नाहीये..तिला त्यांच्या काळजीचं कौतुक आहे. 'ती म्हणाली की अजून वीस-पंचवीस वर्षांनी माझी मुलगी कुणाला डेट करतेय याकडे मला लक्ष द्यावंच लागेल'. मला सहज जाणवलं की जगात कुठेही गेलं तरी मुलीबद्दल तिच्या आई-वडलांना वाटणारी काळजी कुठे कमी-जास्त होत नाही" आदित्य थोडं गमतीत म्हणाला पण रमाचा चेहरा पाहून त्याला त्याच्या बोलण्याचं गांभीर्य लक्षात आलं.
"रमा, सॉरी..तुला हर्ट होईल असं काहीतरी मला बोलायचं नव्हतं...पण काही इमोशन्स सोशिओ-सायकॉलॉजीने बदलत नाहीत हे लक्षात आल्यावर मला हे बोलल्याशिवाय राहावलं नाही...स्पेशियली तुझ्याशी" आदित्य  म्हणाला. 'सोशिओ-सायकॉलॉजी' असा जड शब्द ऐकून रमाला त्याही परिस्थितीत हसू आलं. 
"आदि, तू हल्ली मराठीऐवजी कठीण कठीण इंग्लिश शब्द वापरायला लागला आहेस. 'केओटिक सेल्फ' आणि आता हे 'सोशिओ-सायकॉलॉजी'..अमेरिकेला आल्याचा हा इफेक्ट का?" रमाने विचारलं.
"हा इफेक्ट म्हणजेच सोशियल सायकॉलॉजी गं...आपण एकत्र राहतो या गोष्टीचं साराला एक अमेरिकन म्हणून कौतुक वाटलं. तेच आपल्याकडच्या सगळ्यांनी काहीतरी चुकीचं घडतंय असं बिहेव्ह केलं..पण मुलीचा बॉयफ्रेंड,मित्र, रूममेट हा विषय इथेही लोकांसाठी अजूनही तेवढाच नाजूक आहे..अमेरिकन असो, इंडियन असो किंवा अजून कुणी असो, मुलीची काळजी सगळ्यांना तेवढीच" 
रमा पुन्हा थोडी भावूक झाली.
"रमा,आपण गेले काही महिने एकत्र राहतोय..मी तुला कधीच बोललो नाही पण मला तुला इतकंच सांगायचं आहे की तू तुझ्या आईशी खरं बोलली नाहीयेस याची मला जाणीव आहे आणि ही लपवाछपवी तूसुद्धा निव्वळ 'आदर' म्हणून केलेली आहेस याचीही मला कल्पना आहे" रमा त्याच्याकडे पाहते आहे याची खात्री झाल्यावर आदित्य म्हणाला. तिने डोळे मिटून मान डोलवली. शांततेत जेवणं झाली. जेवून उठताना रमा आदित्यला म्हणाली.
"आदि, मी ठरवलंय..एकदा सेम संपली ना की आईला सगळं खरं खरं सांगायचं..आपण बरोबर राहत असलो-नसलो तरी"
तिच्या वाक्यातल्या 'नसलो' शब्दाने त्याला मनापासून वाईट वाटलं होतं. दुसरा काहीच पर्याय नसेल तर घरी असं काहीतरी सांगायचं अशी त्याची जनरल फिलोसॉफी होती. त्यामुळे साहजिकच त्याच लॉजिकने 'रमाबरोबर यापुढे आपण राहणार नाहीये' असा त्याने अंदाज बांधला.  

निव्वळ तडजोड म्हणून एका अनाहूत क्षणी एकत्र राहायचा निर्णय आदित्य आणि रमाने घेतला. आपले हेतू स्पष्ट आणि स्वच्छ आहेत हे स्वतःला, समोरच्या व्यक्तीला आणि आजूबाजूच्या प्रत्येकाला पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न दोघांनी वेळोवेळी केला होता.पण पाचेक महिन्यांच्या काळात दोघांना नुसती एकमेकांची सवयच झाली नव्हती तर दोघे एकमेकांत गुंतले होते. 'आपण निव्वळ रूममेट्स म्हणून एकत्र राहणारोत तेव्हा सहवासाने एकमेकांबद्दल जाणून घेणं हे मला लग्न झालेल्या जोडप्यासारखं वाटतं' असं आदित्य गमतीत एकदा म्हणालासुद्धा होता. पण अपेक्षित-अनपेक्षित वळणं घेत दोघांचं नातं निर्णय घेण्याच्या स्टेजला आलं होतं. अनिताचा विसा झाला होता आणि नितीनला यायला चारेक दिवस उरले होते.  

परीक्षा झाल्यावर आदित्य घरी आला तेव्हा रमा आली नव्हती. तिला लॅबमध्ये वेळ लागणार असल्याचं तिने त्याला सकाळीच सांगितलं होतं. तिच्याशी काय आणि कसं बोलायचं याचा निर्णय आदित्यला घेता येत नव्हता. आपण रमाबरोबर गेले पाच साडेपाच महिने खूप विशेष कुरबुरी न होता, तिला आपल्यामुळे कुठला त्रास न देता राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याची त्याने स्वतःशीच पुन्हा एकदा खात्री केली. त्याला यापुढेही असंच राहायचं होतं. अजून आठवडाभराने सगळं बदललेलं असेल याचा पुरेपूर अंदाज असूनसुद्धा रमाशी जेव्हा हा विषय डिस्कस होईल तेव्हा 'मला तुझ्याबरोबरच राहायला आवडेल' हे निदान तिच्या कानावर घालायचं आदित्यने नक्की केलं. रमा घरी आली तेव्हा आदित्य बाहेरच सोफ्यावर लवंडला होता. 
"आदि, आत जाऊन झोपतोस का?" तिने त्याला हाक मारली. तो दचकून जागा झाला. 
"तू कधी आलीस?किती वाजले?" त्याने झोपेत विचारलं.
"मी जस्ट आले..सहा वाजलेत"
"ओह ओके..म्हणजे मी जास्त वेळ झोपलो नाहीये.."
"झोपलास तरी काही हरकत नाहीये..काहीच काम नाहीये..थोडा वेळ झोपणार असलास तर झोप.."
"नाही..झोप नाही येते मला...तू आत्ता बिझी असणारेस का?"
"का?"
"बाहेर गेलो असतो.."
"आदि, आपण घरात जेवूया..बाहेर जायची गरज नाहीये..मी जेवण करेन हवं तर"
"जेवायला नाही गं! असंच. कॉफी प्यायला.रूम-मेट्स टाईम! जेवण आल्यावर करेन मी.."
"लगेच जायचंय?"
"हो..तू रेडी आहेसच! तुला अजून एक्सट्रा स्वेटर वगैरे घ्यायचा असला तर घे! थंडी बऱ्यापैकी वाढलीय गेल्या तीन-चार दिवसात. मी तोंडावर पाणी मारून येतो" तिने मान डोलावली.
आदित्य फ्रेश होऊन आला आणि दोघे घरातून बाहेर पडले.
"आपण नुसते चालणार आहोत की काही बोलणार आहोत?" रमाने विचारलं. आदित्यने खिन्न हसून तिच्याकडे पाहिलं.
"नाही म्हणजे एकदा तूच म्हणाला होता की साधारणपणे मित्र-मैत्रिणी असे फिरायला बाहेर पडले की शिळोप्याच्या गप्पा मारतात आणि तुझ्याकडे गप्पा मारायला विषय नाही हेही होऊ शकत नाही"
"विषय आहे बोलायला..पण जरा शांत बसू आणि बोलू.." आदित्यने उत्तर दिलं. रमा गप्प झाली. आदित्य काय बोलणारे याची तिलाही कल्पना आली. आपण त्याच्याशी काय बोलायचं आहे याची तिनेही मनात उजळणी सुरु केली. 
बाहेर कधीच अंधार पडला होता. जेवायला, फिरायला बाहेर पडलेले तुरळक विद्यार्थी सोडून फारशी वर्दळ नव्हती. एका स्ट्रीट लाईटच्या खाली दिसलेल्या रिकाम्या बाकावर दोघे जाऊन बसले. 
"नितीनचा फोन येऊन गेला मला. तो येतोय परवा" आदित्य म्हणाला.
"ओह ओके.." तिने तुटक उत्तर दिलं.
"अनितापण अजून दोनेक आठवड्यात येईलच.." त्याने तिच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करत पुन्हा वाक्य टाकलं.
"हं" 
"मग आपण दुसरं अपार्टमेंट बघायला सुरुवात करायची ना?" आदित्यने निर्वाणीचा प्रश्न विचारला. तिने त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही. आदित्य उत्तराची वाट बघत तिच्याकडे पाहत राहिला. दोनेक मिनिटं गेली. तिने त्याच्याकडे पाहत मान डोलवली.
"रमा, फॉर व्हॉट इटस वर्थ..मला इतकंच सांगायचं आहे की माझे गेले पाच-साडेपाच महिने खूप चांगले गेले. जर शक्य असतं मला यापुढेही तुझ्याबरोबरच राहायला आवडलं असतं" आदित्य एक एक शब्द शांतपणे बोलला. 
रमाने त्याच्याकडे पाहिलं. ती काय प्रतिक्रिया देणारे याची त्याला काहीच कल्पना येत नव्हती. 
"आदि, खरंतर मलासुद्धा हेच म्हणायचं होतं" ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"ओह" दोघांनी एकमेकांची नजर चुकवली. प्रश्न तसाच होता- पुढे काय?
आपण जिच्यात इनव्होल्व्ह झालो ती व्यक्तीसुद्धा आपल्यात गुंतलीय हे कळण्यासारखं सर्वोत्कृष्ट फिलिंग जगात कुठलं नाही. 'मला तिच्याबरोबर रहायचंय आणि तिला माझ्या बरोबर!' इथेच 'हॅप्पी एंड' झाला असता तर किती बरं झालं असतं असा विचार आदित्यच्या मनात येऊन गेला. पण इतकं सोप्पं नव्हतं. आता प्रश्न वाढत होते.  

"मग आता?" आदित्यचा कन्फ्युस प्रश्न!
"मला नाही माहित" रमाने ती निरुत्तर झाल्याचं कबूल केलं.
"रमा, मला माहितीय की तू चिडणारेस या प्रश्नावर. पण आपण बरोबर करतोय काय गं? मोर ओव्हर, आपण पहिल्यापासून कधीतरी बरोबर वागलो का?"
"तुला असा प्रश्न का पडला?" 
"आपण दोघांनी एका रिलेशनशिप किंवा जे काही आहे, होतं ते असताना एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आज आपल्याला एकमेकांबरोबर राहायचं आहे. घरच्यांशी आपण खोटं बोलतोय. आणि सगळ्यात महत्वाचं- मी खूप प्रामाणिकपणे कबूल करतो की 'मला तुझ्याबरोबर राहायला आवडेल' इथेच स्टेटमेंट संपतंय माझं. ते सोडून या क्षणाला तुझ्याबद्दल मला काय वाटतंय ते मला सांगता पण येणार नाही"
"आदि, आपलं हेच चुकलं बहुतेक. पहिल्यापासूनच! आपण घरच्यांना काही सांगितलं नाहीच, पण एकमेकांनासुद्धा कधीच काहीच ओपनली सांगितलं नाही. त्यामुळे आपल्याला एकमेकांबद्दल नाविन्य,गूढ वाटत राहिलं हे खरं, पण आता वेगळं राहण्याची वेळ आली तर अशी गुंतागुंत झालीय" रमा त्याच्याकडे बघत म्हणाली. 
"अ...आपण सुशिक्षित, समंजस असणं अपेक्षित आहे नाही का?" त्याने चेहऱ्यावर उसनं हसू आणून ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा काही वेळ शांतता! 
"तुला माझ्याबरोबर का राहायचं आहे?" त्याने पुन्हा शांतता भंग केली. तिने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. त्याने जीभ चावली. रमा बोलायला लागली.
"आदि, तू गैरसमज करून घेणार नाहीस याची खात्री आहे मला म्हणून सांगते. श्री गेली काही वर्ष माझ्याबरोबर आहे. त्याला माझ्याबद्दल आपुलकी आहे,प्रेम आहे आणि तेवढाच तो माझ्यावर हक्कसुद्धा गाजवतो. इथे येण्यापूर्वी मी त्याला मी एवढ्यात त्याच्याशी लग्न करू करणार नाही असं सांगून आले कारण मला त्याच्या प्रेमापेक्षा त्याच्या हक्क गाजवण्याचं जास्त टेन्शन आलं. तो खूप कमिटेड आहे पण तो ती कमिटमेंट बोलूनसुद्धा दाखवतो. मला माहितीय की बऱ्याच मुलींना माझ्याबरोबर इतका आयडियल,कमिटेड मुलगा असल्याचा हेवा वाटेल. याला माझा मूर्खपणा म्हण,स्टबर्नपणा म्हण पण मला नेमकं हेच नकोय. गेल्या पाचेक महिन्यांचं म्हणालास तर- आय हॅव्ह बीन मी..जस्ट मी..जस्ट लाईक दॅट. तुझ्याबरोबर मला का राहायचं आहे विचारलंस तर आत्ता मला हेच कारण सुचतंय! आणि माझंही स्टेटमेंट इथेच संपतंय. मला हे असलं जड बोलणं जमत नाही,आवडत नाही. पण कदाचित आपण परत हा विषय कधीच बोललो नाही तर सांगायचं राहून गेलं असं मला वाटायला नकोय!"
आदित्य तिच्याकडे एकटक पाहत होता. ती बोलायची थांबली आणि त्याने खांदे उडवत नजर वळवली. 
'ऑकम, मला आदिबरोबर राहायचं आहे. त्यालासुद्धा माझ्याबरोबर राहायचं आहे. समस्या थोडी गुंतागुंतीची आहे. आहे का काही सोप्पं उत्तर?' रमाच्या मनात विचार आला. 

"आपलं अपार्टमेंट कुणी ठेवायचंय?" रमाने निर्विकार आवाजात विचारलं. आदित्य मान खाली घालून बसून राहिला. त्याचे प्रश्न संपले नव्हते.
"रमा, मग आपण जे वाटतंय ते सगळं विसरून जायचं आणि वेगळं राहायला लागायचं?" त्याने जवळ पडलेला एक तुरळक दगड बुटाने उडवत प्रश्न विचारला.
"मग आपण काय करू शकतो? आपण एकत्रच राहू अशी कुणाला शंका जरी आली तरी बाबा, श्री, बाकीचे लोक त्यातून भलते-सलते अर्थ काढतील आणि त्यात आपलं काय चाललंय हे या मुमेंटला आपल्यालाच नीट माहीत नाहीये"
"रमा, हिंदी सिनेमांमध्ये बरं असतं ना? हिरो-हिरोइन्सना एकमेकांबद्दल अचानक साक्षात्कार होतात मग त्यांच्या आयुष्याला आणि पर्यायाने सिनेमाला भलतीच कलाटणी मिळते. पण तुझ्या-माझ्या साध्या, खऱ्या, 'बोरिंग' आयुष्यात तसं नाहीच होत बहुतेक! कारण खऱ्या आयुष्यातले प्रश्न, परिस्थिती या गोष्टी सिनेमांपेक्षा जास्त कॉम्पलिकेटेड असतात. आपले कुठलेच विचार, दृष्टीकोण, नातेसंबंध कधीच एका क्षणाच्या मोठ्या साक्षात्कारानंतर बनत नाहीत आणि नष्ट होत नाहीत.नैतिकता, विश्वासार्हता सारख्या बेसिक महत्वाच्या गोष्टी आपले संस्कार विसरू शकत नाहीत आणि म्हणून एखादा निर्णय भावनिकपणे  घ्यायचा की व्यावहारिकपणे हे ठरवताना आपण जास्त कन्फ्युस असतो" 
"आदि, मी आईला फोन करणारे आज! आणि तिला सगळं खरं-खरं सांगणारे..निदान मला ते ओझंतरी माझ्या डोक्यावरून काढून टाकायचं आहे"
"पण जर का यापुढे आपण बरोबर राहणार नसू तर मग आईला सांगणं कशासाठी?" 
"तिला श्रीकडून, बाबांकडून कळलं तर तिचा माझ्यावर विश्वास नाही राहणार..मला ते नाही होऊन द्यायचं"
"रमा, मी पण घरी सांगून टाकतो सगळं..." आदित्य पटकन म्हणाला. रमाने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं.
"हो, तुला आईशी बोलायचं आहे कारण तुला मानसिक शांतता हवीय, मला घरच्यांशी बोलायचंय कारण मला सोल्युशन हवंय"
"सोल्युशन?"
"हो, माझे निर्णय आत्तापर्यंत घरचेच घेत होते नाही का? मग माझ्या या मानसिक गोंधळावर त्यांच्याकडे काहीतरी उत्तर असेल या आशेने त्यांच्याशी बोलायला हरकत नाही"
"आर यु श्युअर?"
"नॉट रिअली.." तो नर्व्हस हसत म्हणाला. रमाला हसायला आलं.
"निघायचं?" रमाने विचारलं. दोघांना उठायची इच्छा नव्हती पण बेटर पर्याय नव्हता. बसून चर्चा करण्यात तात्विक, वैचारिक गोंधळ वाढत होते. दोघे उठून चालायला लागले.

सेमेस्टर संपलं होतं. 'काहीतरी अनपेक्षित घडून आपल्याला एकत्र राहायला मिळालं तर?' हाच विचार या क्षणाला दोघांच्याही मनात येत होता.

क्रमशः 

12 comments:

anup said...

Ek number..!! Lavkar pudhacha bhaag taak please.. :)

-Anup

nik said...

bhag wadhavale tari chalatil .chan jamaliye katha

pravin sawal said...

Kharach khup mast aahe katha
yaar
lai bhaari

Parag said...

Kal ha blog sapadala ani hya katheche sagaele bhag vachun kadhle.. Sahi ahe katha.. ! Detailing, character establishment ani vatavaran nirmitee mast.. Pudhche bhag lihi patapat..:) Tuza bakicha blog pan vachto..

Unknown said...

Bharri

Whats in the name...! said...

Bhari re.. mast rangliy katha.. eagerly waiting for next part.. jast wait nako karaila lavu.. :)

Chaitanya Joshi said...

@Anup:
पुढचा (शेवटचा) भाग टाकलाय! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! अशीच भेट देत राहा!

Chaitanya Joshi said...

@Nik:
मागे म्हटलं तसं..कथेचा व्याप एवढाच ठरवला होता..म्हणून थांबतोय..पुन्हा काही सुचलं तर नक्की लिहीन...प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

Chaitanya Joshi said...

@Pravin:
खूप खूप धन्यवाद!

Chaitanya Joshi said...

@Parag:
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! शेवटचा भाग नुकताच पोस्ट केला...इतर ब्लॉगसवर तुमची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल..अशीच भेट देत राहा!

Chaitanya Joshi said...

@hanumant Jadhavrao:
aa-'bharri' aahe!!!
ashich bhet det raha!

Chaitanya Joshi said...

@Atul:
Shevatcha bhag nuktaach post kelaa..I hope to aawdel :)
pratikriya jarur kalava...ani yaapudhehi ashich bhet det raha :)